दोन दिवसापूर्वी नवभारत कन्या विद्यालयाचे माजी शिपाई शरद नागोशे यांची भेट झाली. त्यांनी सांगीतले, ‘त्या तलावाचे पाणी आता लोकांच्या घरात शिरत आहे.’
मी उत्सुकतेने विचारले, ‘कोणत्या तलावाचे?’
‘तोच तलाव, ज्या तलावातून दररोज हजारो रूपयाचे सागवानची तस्करी रोज व्हायची, तुम्ही पेपरला बातमी दिली आणि चौघांना अटक झाली!’
मला सुमारे 35 वर्षापूर्वीचा तो घटनाक्रम आठवला. विहीरगांव तलावाचे पाळीवरील हनुमान मंदिरातून मोठ्या प्रमाणावर सागवन तस्करी व्हायची! त्यांची माहीती शरद नागोशे यांनी मला दिली होती, तेव्हा मी महासागर या वर्तमानपत्रात वार्ताहर म्हणून काम करीत होतो. बातमीनंतर, चौघांना वनकर्मचारींनी पकडले, शरद नागोशे याला धमकीही मिळाली, चौघाना अटक झाली.
मी यावेळच्या पावसात त्या तलावाजवळ जाण्यांचा प्रयत्न केला, जीथे घटना घडली होती, तीथपर्यंत जाता आले नाही, मात्र या पावसाळ्यात तलावाचे पाणी लोकांच्या घरात का घुसले? याचा काहीसा अंदाज आला.
मूल शहर पाणीमय होण्यास, स्मार्ट सिटीच्या नांवावर, शहराची टोपोग्राफी न बघता, सिमेंटचे केलेले उंचच उंच रस्ते, न केलेल्या नाल्या, ज्या केल्या, त्या तांत्रिकदृष्ट्या सदोष असणे हा एक भाग, आणि जे केले त्या अर्धवट असणे हेही एक कारण शहरात लोकांच्या घरात जलस्तर वाढण्यांस कारणीभूत ठरला आहे. मात्र हे लोकांच्या घर पाणी पाणी होण्यांस हे एकमेव कारण आहे काय? याचे उत्तर नाहीच असे आहे. माझे पाहणीतच, मूल शहरात 9 लहान—मोठे तलाव बोड्या होत्या. त्या आता कुठे आहेत? त्यांची परिस्थिती काय आहे? शहरात येणारे पावसाचे सर्व पाणी पूर्वी या गावाभोवतालच्या आणि गावातल्या तलावात, बोळ्यात जायचे. आता समजा रस्ते—नाल्या चांगले बांधल्या तरी, पावसाचे पाणी या रस्त्यावरून नाल्यात जातील.. नाल्यातून हे पाणी कुठे जाईल?
मी, 11 वी पासून कर्मवीर महाविद्यालयात शिकायला जातांना, आज जीथे दुर्गा मंदीर परिसर आहे, तीथे मोठा तलाव होता. पावसाळ्यात या तलावाचे पाणी रस्त्यावर यायचे. बाजूलाच शेती होती, शेतीला या तलावाचे पाणी जायचे.. आज शेतीत घरे आहेत, आणि तलावात अतिक्रमण! पाणी जाणार कुठे?
ज्या विहीरगांव तलावाचा उल्लेख मी आधी केलेला आहे, त्या तलावातही विहीरगांवचे बरचसे नाल्यांचे पाणी तीथे जमा व्हायचे, आता त्या जागेवर घरे आहेत, काही अतिक्रमणही आहे. पावसाचे पाणी विहीरगांवातून आता जाणार कुठे?
गोंदियावरून चंद्रपूरकडे जाणारी जुनी रेल्वे लाईन ही तलावाचे मध्यभागातून होती. याचा अर्थ रेल्वे लाईनच्या दोनही बाजूला युवाशक्ती व्यायाम मंडळाचे जागेपर्यंत तलाव होता. त्यात भरभरून पाणी रहायचे. आता रेल्वे लाईच्या एकाच बाजूला तलाव आहे.. दुसर्या बाजूला नगर परिषदेसह अनेकांनी भरण भरून, घराचे बांधकाम केले असेल तर या भागात जमा होणारे मोठ्या प्रमाणावरील जलसाठा जाणार कुठे?
अनेकांना ठावूक असेल, चंद्रपूर रोडवर आज जीथे नगर परिषदेचे व्यापारी संकुल होत आहे, तीथे पूर्वीच्या न.प. नाट्यगृहाचे जागेवर छोटी बोडी होती. कमळाचे फुलासह जैवविविधता या बोडीत होती…, अनेक महिला कपडे तीथे धुवायच्या हे आता सांगूनही अनेकांना खरं वाटणार नाही परंतू, या पाण्याच्या स्त्रोतात सामावणारे पाणी आज लोकांच्या घरात शिरत नसेल काय?
भाग्यरेखा मंगल कार्यालयाचे मागील भागातील पाणी, मराळ मोहल्ला, कुणबी मोहल्लातील सर्व पाणी हे माराई मंदिराजवळच्या मा.मा. तलावात (माराई बोडी) साठवल्या जात होते. हा तलावाही बराच मोठा होता. आज या तलावाची परिस्थिती काय आहे? येथील जवळपासची शेतजमिन एनए केली, मात्र पावसाचे पाण्यांची व्यवस्था झाली काय??
हीच परिस्थिती, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील एका मोठ्या तलावाची (वरठी बोड़ी) आहे, अशीच परिस्थिती ताडाळा रोडवरील, बुटले यांचे घरामागील बोडीची आहे. उपजिल्हा रूग्णालय मूलच्या मागील मोठा तलावही असाच मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट झाला आहे.
घरे नाही, घरांना जागा नाही अशांनी अतिक्रमण केले. अशांना घरकुल आणि जागा देणे हे निश्चितच शासनाचे काम आहे, शासनानी आपली जबाबदारी पूर्ण न केल्यांने, या सर्वांनी पाण्याच्या स्त्रोत्रात अतिक्रमण केले. मात्र पूर्वीचे पाटबंधारे आणि आताचे जलसंपदा विभाग काय करीत होते? वनजमिनीवर जर अतिक्रमण होत असेल तर, ते वनविभाग सहन करीत नाही, जलस्त्रोत्रावरील अतिक्रमण होत असतांना, पाटबंधारे विभागाची भूमिका काय? जर नैसर्गीक जलस्त्रोत्र नष्ट होत असेल तर, कितीही चांगले रस्ते आणि नाल्याचे बांधकाम केले तरी, पाणी घरात शिरणारच आहे, यात पाण्यांचा काय दोष? शेवटी पाणी आपला मार्ग शोधतोच!
विजय सिद्धावार, मूल
9422910167