दिंदोडा प्रकल्पग्रस्तांचा लोकलढा

आपण सर्वच विविध प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांच्या लढ्याचे वार्तांकन -वृत्तांत वाचन वाचत असतो. प्रत्यक्ष त्या भूमीवर काय चाललं असेल याचे चित्र डोळ्यासमोर वाचकांसमोर उभे राहते .आपल्या महाराष्ट्रातील विस्थापितांच्या लढ्याची उदाहरणे म्हणजे सरदार सरोवर- नर्मदा नदी, दुसरे उदाहरण म्हणजे विदर्भातील वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरण .या दोन प्रकल्पाने बाधित लोकांच्या लोक लढ्याने महाराष्ट्रातील लोक हादरून गेले.
विदर्भात वर्धा नदीवर, चंद्रपूर- वर्धा -यवतमाळ या तीन जिल्ह्यांची विभाजन रेषा असणाऱ्या वर्धा नदीवर दिंदोडा या गावाजवळ 1991 मध्ये एक बॅरेज बांधण्याचे ठरले. हे बॅरेज निप्पाॅन डेनरो या मल्टिनॅशनल कंपनीसाठी होते .पण 1993 मध्ये होणारा निप्पाॅन डेनरो चा भद्रावती येथील प्रकल्प रद्द झाला. आणि हा दिंदोडा बॅरेजही थंडबस्त्यात गेला .मात्र या बॅरेज साठी वर्धा -यवतमाळ -चंद्रपूर या जिल्ह्यातील 23 गावांच्या शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या .त्यावेळी त्यांना अल्प मोबदला देण्यात आला.
1993 ते 2017 एवढा दीर्घकाळ थंडबस्त्यात असलेल्या या दिंदोडा बेरेजचे पुनर्जीवन करण्यात आले. आणि नव्याने निविदा इत्यादी काढून बॅरेजचे काम करण्याचे सरकारने ठरवले. दरम्यान 2013 -14 मध्ये केंद्र सरकारने जमिनीच्या मोबदला देण्याबाबत नवीन कायदा केला. व बाधित होणाऱ्या 23 गावातील शेतकऱ्यांनी अन्य गावकऱ्यांनी 2013 चे कायद्याप्रमाणे योग्य मोबदला,योग्य पुनर्वसनासाठी गेल्या पाच सहा वर्षांपासून आपला लढा सुरू केला. या लढ्याला साथी विलास भोंगाडे यांचे नेतृत्व व मार्गदर्शन लाभले आहे. स्थानिक कार्यकर्ते पुंडलिक तिजारे ,अभिजीत मांडेकर यांनी दिंदोडा बॅरेजग्रस्त संघर्ष समितीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.
या संघर्ष समितीने आजपर्यंत अनेक अभिनव आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र शासन अद्याप हलायला तयार नाही. शासनाला हलवण्यासाठी बाधित गावकरी त्या -त्या आमदारांचे घरावरही धडक देऊ लागले.
या संघर्ष समितीने अगदी नागपंचमी सारख्या खेड्यातील सणाचे दिवशी सुद्धा पवनी या गावी बैठक घेऊन लढा प्रखर करण्याचे ठरवले. त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर आंदोलनाचे प्रयोग केले.


1मार्च 2023 या तारखेला दिंदोडा या गावात वर्धा नदी किनाऱ्यावर 24 तास धरणा कार्यक्रम झाला. यासाठी बाधित सर्व गावातील लोक शिदोऱ्या बांधून, आपली बैल बंडी, ट्रॅक्टर सजवून व भजनी मंडळी सोबत अन्य संघर्ष गीत गात धरणस्थळी पोहोचले. तेथे घोषणांनी आसमंत दणाणून सोडला.सायंकाळी नदीपात्रात दीपदान करण्यात आले. मानवी साखळीही झाली. रात्रीला भजन ,संघर्ष गीत, गजला, गोंडी गाणे, लोकगीतांचा कार्यक्रम झाला .हा कार्यक्रम रात्रभर पहाटेपर्यंत सुरू होता. सोबत आणलेल्या शिदोऱ्या सोडून सामूहिक जेवण झाले. सकाळी पुन्हा नदीपात्रात मानवी साखळी करून सरकारला इशारा देण्यात आला. आणि दुपारी 12 वाजता या 24 तास आंदोलनाची सांगता उपस्थित जलसंपदाचे अधिकारी ,पोलीस, तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
यानंतर 6 जून 2023 ला वर्धा- वना नदी संगमावरील सावंगीच्या विठ्ठल मंदिराजवळ सभा घेऊन दिवसभर ठिय्या देऊन सायंकाळी सर्व आंदोलनकर्ते नदीपात्रात उतरून विशाल मशाल मोर्चा काढण्यात आला.
दिनांक 6 ऑक्टोंबर 2023 ला चंद्रपूर येथे पालकमंत्री चंद्रपूर यांचे कार्यालयावर रूमने मोर्चा नेण्यात आला .
ऐन दिवाळीमध्ये १३ नोव्हेंबर 2023 ला बाधित गावातील बालकांनी दिंदोडा या धरण स्थळावर आपले सणाचा आनंद बाजूला ठेवून दिवसभर ठिय्या आंदोलन केले. त्यांनी सरकारला आपल्या भाषणातून खडे बोल सुनावले.


आंदोलनाची धक कायम ठेवायची असा निर्धारच दिंदोडा संघर्ष समितीने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर स्थित सिंचन महामंडळाच्या जलसंपदा कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना दिनांक- 6 जुलै 2023 व हिवाळी अधिवेशन सुरू असताना 11 डिसेंबर 2023 ला घेराव घातला. त्यांना कार्यालयातच अडवून धरण्यात आले . 11 डिसेंबरच्या घेराव आंदोलनाला वणी -राळेगावच्या आमदारांनी भेटी दिल्या. त्यांनी उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, गृहमंत्र्याशी भ्रमणध्वनीवर बोलणे करून दिले .त्यांनी आश्वासन दिले की, अधिवेशन संपू द्या. लगेच मुंबईला याबाबत मीटिंग लावण्यात येईल .मात्र जलसंपदामंत्री यांचे हे आश्वासन खोटेच ठरले. त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे काहीही केले नाही. धरणामुळे बाधित गावातील लोकांचा आक्रोश वाढू लागला .तेव्हा पुन्हा या शेतकरी, शेतमजूर व अन्य जनतेने सत्याग्रहाचे हत्यार उपसले. व पुन्हा 20 जानेवारी 2024 ला सावंगी या नदीकिनारी दिवसभराचा ठिय्या कार्यक्रम झाला. या ठिय्या आंदोलनात राम प्रभू सितारामजी सरदार यांनी आपली व्यथा सांगितली. ते म्हणाले ,2013 मध्ये भूसंपादनाच्या नवा कायदा आला. त्यातील तरतुदीनुसार पाचपट मोबदला मिळावा. कुटुंबातील एकाला नोकरी आणि पर्यायी शेती मिळावी. एवढी कायदेशीर मागणी आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत लढाई सुरूच राहील.
याच 20 जानेवारी ठिय्या आंदोलनाच्या दिवशी पुन्हा 24 तास ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा पुंडलिक तिजारे व अभिजीत मांडेकर यांनी केली. सर्वांनीच त्यास होकार भरला
आणि पुन्हा एकदा बैल-बंडी, ट्रॅक्टर, रेंग्या सजल्या. लोकांनी शिदोऱ्या बांधल्या, घराला कुलूप लावले .म्हातारे मुल-बाळ यासह धरण बाधित आंदोलन कर्ते यावेळी यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या सावंगी या नदीकाठावरील गावात दाखल झाले. धरणापासून दोन कि.मी. वरूनच आंदोलनाची सुरुवात झाली . घोषणा- गाणे- भजनाने परिसर हादरून गेला. लोक ‘करो या मरो ‘या महात्मा गांधीच्या घोषणेनुसार निकराचा लढा देण्यास सत्याग्रही बनवून आले. तोच जोश, तोच उत्साह आणि तोच दुर्दम्य आशावाद घेऊन सावंगी ठिकाणी एकत्र आले . नदी काठावर उभारलेल्या पेंडॉलमध्ये आम्ही का लढत आहोत. सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागेल अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
या 13 -14 फेब्रुवारी 2024 च्या 24तास ठिय्या आंदोलनासाठी पुण्याहून सामाजिक कृतज्ञता निधी – समाजवादी प्रबोधिनी- एस.एम. जोशी फाउंडेशनचे विश्वस्त सुभाष वारे उपस्थित होते. ते या आंदोलनात 24 तास थांबले. बाधित आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. सुभाष वारे म्हणाले घटनेतील कलम 39 चा उल्लेख केला .स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेचे पुरेशी साधन मिळावे. अशी तरतूद या कलमात केलेली आहे. योग्य मोबदला न देता शेती सरकारने ताब्यात घेतली आणि या कलमाचे उल्लंघन केले. सायंकाळी सूर्य उतरणीला जाताना आंदोलनकारी नदीच्या पात्रात घोषणा देत उतरले .नदी पात्रात दिवे सोडले .संकल्प केला. तेथे काही कार्यकर्त्यांनी संबोधन केले. हा कारवा पुन्हा नदी काठावरील पेंडाॅल मध्ये गेला . तेथे सुभाष वारे यांनी महात्मा फुले यांच्या अखंडाचे पठण केले. या पठणानंतर आंदोलनकर्त्यांनी आणलेल्या शिदोऱ्या सोडल्या. आपल्या शिदोरीतील भाजी- भाकरी, चटणी ,पोळ्या एकमेकांना देत सामूहिक भोजन केले. गायन- भजन -गोंडी गाणे- संघर्षाचे गाणे रात्रभर सुरू होते. सुखदेव येरकडे या आदिवासीने स्वरचित गाणे म्हटले.
ते म्हणाले –
‘बैल बंडी आनली बाई
शिंदे सरकारले दावाले
माझी शेतकरी मंडळी आली
दिंदोडा बरेज पावाले.’
त्यांच्या ढोलाचे आवाजाने रात्रीच्या शांत वातावरणात हा आवाज सरकारपर्यंत पोहोचला असेलच. साथी सुभाष वारे यांनीही वामनदादा कर्डक यांचे गीत गाऊन दाखवले .नदी थळी एक आंदोलन रात्रभर धगधगत होते .
14 फेब्रुवारी ला सकाळी पुन्हा आंदोलन करी आपल्या बैल बंड्यांसह शिस्तबद्धतेने नदीपात्रात उतरले .मानवी साखळी केली. ‘जमीन आमच्या हक्काची ,नाही कुणाच्या बापाची’
लढेंगे -जितेंगे ,’जितेंगे – लढेंगे’.
‘2013 चे कायद्याप्रमाणे मोबदला मिळालाच पाहिजे’. अशा गगनभेदी घोषणांनी वर्धा नदीचे पाणीही थरथरले .
या मानवी साखळीचे वेळी बाधित गावातील पंचकन्या ज्या वर्ग चौथीमध्ये शिकतात. त्यांनी उत्स्फूर्त भाषण करत सरकारला जाब विचारला .मच्छीमार करणाऱ्याच्या मुलीने – स्नेहा भडकेने सरकारला थेट प्रश्नच विचारला– आता माझ्या बापा सह आम्ही जगायचे कसे! हा प्रश्न सर्वांनाच अनुत्तरीत करून गेला. यावरून धरणामुळे बालिकांचा प्रश्न किती योग्य व तीव्र आहे हे दिसून येते . आतापर्यंत या संपूर्ण आंदोलनात महीला बहुसंख्येने व हिरहिरिने सामील होत आल्या. हे वैशिष्ट आहे.
तहसीलदार पोलीस धरणावरील इंजिनियर यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या.
या प्रदीर्घ काळापासून चाललेल्या आंदोलनात वेळोवेळी नागपूर आणि परिसरातील कार्यकर्ते- नेते – शास्त्रज्ञ यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन पाठिंबा दिला .एक नैतिक पाठिंबा जाहीर केला. यामध्ये शेतकरी नेते विजय जावंधिया, शास्त्रज्ञ डॉ.त्रिलोक हजारे, रिपब्लिकन नेते अनिल मेश्राम, तुकडोजी महाराज विचार प्रसारक ज्ञानेश्वर रक्षक, भटक्या विमुक्त मध्ये काम करणारे दिनानाथ वाघमारे ,ओबीसी नेते संजय शेंडे ,कवी -लेखक प्रभू राजगडकर, डॉ गौतम कांबळे, किशोर खांडेकर,समीक्षा गणवीर, अलका मडावी, मनीषा शहरे,अर्चना भगत,सुनिती सु र , या नागपूर -गोंदिया जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहील असा निर्धार बाधित गावकऱ्यांनी केला आहे.

प्रभू राजगडकर,नागपूर