स्व. तुकाराम वाढईची ती कल्पकता ठरली गावकर्यांना वरदान, 
मूल वरून जवळच असलेल्या विरई या छोट्याशा गावात, त्यावेळचे सरपंच तुकाराम वाढई यांनी आपल्या गावकर्यांची हाळोक महिण्यांतच नव्हे तर दुष्काळातही उपासमार होवू नये, आपलाच बांधव अन्नावाचून भुकबळी जावू नये यासाठी साठ वर्षाच्या आधी  विचार केला, विचार  कृतीत उतरवित उभी राहीली ती विरईची धान्य बॅंक! या धान्य बॅंकेतून धान्य घेवून कृतज्ञ झालेले अनेक विरईवासी आजही या धान्य बॅंकेचा लाभ उचलीत आहेत.  केवळ धान्यातून धान्यच नाही तर, प्रत्यक्ष गाव विकासालाही या धान्य बॅंकेने दिलेला मदतीचा हात परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
1960 मध्ये गावचे सरपंच गुलाबखॉ याकुबखॉ पठाण यांचेकडे उपसरपंच असलेले तुकाराम वाढई यांनी गावात हाळोक महिण्यांत होणारी गावकर्यांची उपासमार सांगीतली. त्याकाळी सरकारी मदत, खावटी योजना अशा काहीही सरकारी सवलती नव्हत्या. सावकारी कर्जबाजारात आपल्याच बांधवाना कंगाल करण्यांऐवजी आपणच गावात काही प्रयत्न करता येतो काय? यावर चर्चा केली.  या चर्चेतून आकारास आली, ती धान्य बॅंक. गावातील शेतकरी असलेल्या माळी समाजाने यात पुढाकार घेतला.  50 च्या वर समाजबांधवांनी प्रत्येकी चार पायल्या धान गोळा केले. यात अधिक भर पडावी यासाठी त्यांनी सामुहीक धान बांधणीचे काम केले.  त्यातून जे धान्य आणि पैसे गोळा झाले त्यातून ‘धान फंड’ तयार केला.  जमा झालेले धान, गरजुना वाटप केले. त्याचा हिशेब ठेवला. पुढील वर्षी घेतलेल्या धानापेक्षा थोडे अधिकचे धान गोळा केले. दरवर्षी हा ‘फंड’ वाढत चालला.. हळूहळू या धान्य बॅंकेने मोठा पल्ला गाठला.  याच धान पेढीचा आदर्श घेत, पुढे गावातील ढिवर समाजाने, दलित समाजाने आणि गावच्या हनुमान देवस्थान यांनीही धान्य पेढी तयार करून, आप—आपल्या समाजाची धान्य गरज भागवू लागले.
मधल्या काळात गावात दुष्काळ पडला. शेतात पीक झाले नाही. मजूरांना कामही मिळाले नाही, अशा दुष्काळात या धान्य बॅंकेने विरईवासीयांची भूक भागविली.  सरकारी मदतीशिवाय दुष्काळावर या गावाने मात केली.
चार पायल्या धानानी तयार झालेल्या या धान्य बॅंकेचे आज गावात धान्य साठविण्यांसाठी दोन इमारती स्वखर्चाने बांधण्यात आल्यात.  गावात महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा देखणा पुतळाही याच धान्य पेढीतून उभारण्यात आला.  गावातील गरजू गरीबांना दरवेढी याच धान्य पेढीची मदत होत असल्यांचे अनेकांचे अनुभव आहे. या धान्य बॅंकेत आज अनेकांना वाटप होवूनही 250 क्विंटल धान्य शिल्लक आहे. आवश्यकतेपेक्षा अधिकचे धान्य बाजारात विकले जाते.  जमा झालेल्या पैशातून गावचा आणि समाजाचा विकास कार्यक्रम घेतला जातो.
कुठेही नोंदणी नाही, सदस्यांत कसलीही कुरबूर नाही अशा वातावरणात धान्य बॅंक मागील साठ वर्षापासून विनातक्रार सुरू आहे. या धान्य बॅंकेचे आपले अलिखित नियम आहेत.  जेवढे खंडी धान्याची सभासदाकडून उचल होते, त्यावर प्रत्येक खंडीमागे 5 कुडो धान्य अधिकचे द्यावे लागते.  सर्वांनाच धान्याची दरवर्षी उचल करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकर्यांच्या शेतात नैसर्गीक आपत्तीमुळे धानाचे उत्पादन होवू शकले नाही, अशावेळी धान्याचे बदल्यात तेवढी रोख रक्कम द्यावी लागते… दरवर्षी हिशेब होतो, आणि दरवर्षी नफा..
आज स्वर्गीय तुकाराम वाढई यांचे पुत्र प्रदिप वाढई गावचे सरपंच आहेत, वडिलांचा वसा ते पुढे चालवित आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात सरकारी असलेली सहकारातून अनेक उद्योग सुरू आहेत. नोंदणीकृत सहकारी संस्थाही सुरू आहेत.  मात्र खर्या अर्थांने लोक ऐकत्र येवून सहकारातून निर्माण केलेली आणि अविरत चालणारी विरईची धान्य बॅंक मात्र या सर्वांना निश्चितच आदर्श देणारी आहे.
राष्ट्रिय कुटूंब आरोग्य सर्व्हे – ५ या अलिकडेच प्रकाशीत झालेल्या अहवालातून राज्यासह चंद्रपूर—गडचिरोली जिल्हयात कुपोषण आणि रक्तशुन्यतेचे आजार वाढत असल्यांची आकडेवारी पुढे आली आहे.
या पार्श्वभूमीवर साठ वर्षापूर्वी तुकाराम वाढई यांनी सुरू केलेला यशस्वी प्रयोग गावा—गावात चळवळ म्हणून रूजविण्यांसाठी सरकारने तसेच गावकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
– विजय सिद्धावर
९४२२९१०१६७