पीडित मनोज मरापे, रा. फुलझरी
पुढच्यास ठेच, मागचा शहाणा ही मराठीतील एक म्हण. चिचोंली प्रकरणात ठेच लागल्यानंतरही शहाणे होतील ते वनविभाग कसले? आपली दहशत गावकरी, आदिवासींवर कायम ठेवण्यांसाठी अंगात ‘गुरू’र आणून निष्पापाना ‘प्रसाद’ देण्यांत अलिकडे चंद्रपूर जिल्हयातील वनविभाग अग्रेसर झाले आहेत. चंद्रपूरातील बाबुपेठ वार्डातील सुरेंद्र देवाडकर यांना वनविभागाच्या अधिकार्यांनी केलेली बेदम मारहाण आणि त्यात झालेला त्याचा मृत्यू. चिचोली प्रकरणात वनविभागांनी निष्पाप नागरीकांना केलेली अमानुष मारहाण, गुप्तांगावर लावलेले करंट हे प्रकरणे ताजे असतांनाच, गावकर्यांच्या भाषेत ‘सरकारी गुंडानी’ मूल तालुक्यातील डोणी आणि फुलझरी येथील युवकांना किर्र रात्री, जंगलात नेवून, झाडाला बांधून केलेली बेदम मारहाण प्रकरण उजेडात येणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे.
मराठीच्या जीवावर राजकारण करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे ताब्यात असलेल्या वनविभागाची चंद्रपूर जिल्हयातील गुंडगिरी मराठी माणसावरच सुरू असून ती थांबविण्यांचे नांव घेत नाही, ही निश्चितच चिंतेची आणि संतापाची बाब आहे. चिंचोली आणि डोणी—फुलझरी हे दोनही प्रकरण राज्याचे माजी वन आणि अर्थमंत्री तसेच सध्याचे हेवीवेट आमदार, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे मतदार संघातील आहे. वनविभागाच्या गुंडगीरीचे बळी, हे सुधीरभाऊचेच मतदार आहेत, तरीही त्यांचेकडूनही या प्रकरणावर साधा चक्कार शब्दही निघू नये? हे आश्चर्यच नाही काय?
नेमके काय घडले डोणी—फुलझरी प्रकरण?
दिनांक 30 डिसेंबर रोजी डोणीतील गावकरी, धान दळण्यांसाठी चिरोली येथील राईस मिलवर गेलेत. त्यात डोणीचे रूपेश नैताम, भारत कोवे, आशीक नैताम, रणजीत सुरपाम हे फुलझरी मार्गे डोणीला जायला निघाले. एकाच दुचाकीवर चार व्यक्ती जाता येणार नाही म्हणून, फुलझरीवरून रूपेश, भारत आणि आशिक हे तिघे एकाच दुचाकीवरून निघाले, तर त्यांचे मागे काही वेळाने, फुलझरीचे अरूण मरापे हे आपले नातेवाईक रणजीत सुरपामला घेवून डोणीला निघाले. वाटेत गाडी खराब झाल्यांने, रूपेश, भारत आणि आशिक हे मार्गात थांबून होते. अरूणची गाडी तेथे आल्यानंतर, तेथून भारत एकटाच फुलझरीच्या दिशेने परत जायला निघाला. इतरांनी त्याला थांबविण्यांचा प्रयत्न केला. मात्र तो एकटाच निघाला. मार्गात वाघाची भिती असल्यांने, अरूण मरापे यांचा भाऊ मनोज मरापे व प्रदिप मरस्कोल्हे हेही त्यांचे मागोमाग गेले. मनोजला अरूणने भारत एकटाच फुलझरीकडे गेल्यांचे सांगून, त्याला शोधून गावाकडे ने असा निरोप दिला आणि सर्वजण डोणीला गेले.
दुसरे दिवशी, 31 डिसेंबरला अरूण मरापे यांनी रूपेशचे वडिल कैलाश नैतामला घेवून फुलझरी येथे येत असतांना, जीथे गाडी फेल झाली होती, त्याचे जवळच भारतची पॅंट, वाघाचे ठसे, रक्त आढळून आले. प्रेत ओढून नेल्यांचे चिन्हही दिसत असल्यांने, फुलझरी येथे गावात येवून माहिती दिली. तेथे डोणी गावचे फॉरेस्ट गार्ड बोरकर उपस्थित होते. त्यांचेसह 10/15 गावकरी घटनास्थळी गेले. तीथे भारतचा मृतदेह सापडला. फॉरेस्ट गार्ड बोरकर यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर, वनविभागाचे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी जावून प्रेत ताब्यात घेतले. पंचनामा केला. परिस्थितीजन्य पुरावा पाहून वाघांचे हल्यातच भारतच मृत्यू झाल्यांचे स्पष्ट झाले.
दिनांक 1 जानेवारी नववर्षाचे दिवशी रात्रौ 12 वाजता मूल वनपरिक्षेत्राचे वनअधिकारी व कर्मचारी यांनी फुलझरी येथे जावून मनोज मरापे यांना जंगलात घटनास्थळी घेवून गेले. तेथे त्याला बेदम मारहाण केली. कशासाठी मारहाण होत आहे, हे मनोज कळले नाही आणि वनअधिकार्यांनीही सांगीतले नाही. रात्री दोन वाजता डोणी येथून आशिक नैताम याला घरातून उचलून जंगलात घटनास्थळी आणले. झाडाला बांधून बेदम मारहाण केली. या दोघांना ऐवढी जबर मारहाण करण्यात आली कि, दोघांनाही जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारीसाठी उचलून न्यावे लागले.
काय आहे गावकर्यांचा आरोप?
वनविभागाच्या अन्यायी आणि बेदम मारहाणीची तक्रार उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांचे माध्यमातून जिल्हाधिकारी अरुण गुलहाने यांचेकडे करण्यात आली. या तक्रारीनुसार दिनांक 1/1/2020 च्या 12.30 (रात्रौ) च्या दरम्यान वन क्षेत्र संचालक गुरू प्रसाद यांचे ईशार्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. नायगमकर व उपक्षेत्र अधिकारी श्री. धुर्वे तसेच वनक्षेत्र अधिकारी श्री. वाघमारे श्री. चनकापूरे, श्री. बोरकरख् श्री. ठाकरे, सौ. वासेकर, त्यासोबतच एस.टी.एफ.चे कर्मचारी, आशिष नैताम, श्री. रंजीत सोयाम, श्री. रूपेश नैताम रा. डोणी व मनोज मरापे फुलझरी यांचे घरात घुसून त्यांना उचलून जबरदस्तीने ओढत गाडीत कोंडून वन अधिकारी आणि कर्मचारी यांनी जंगलात नेवून ‘तुम्हीच श्री. भारत कोवेचा खून केला असा बयान पोलिसांना द्यावा‘ अशी जबदरस्ती करून व दबाव आणून बेदम मरेस्तोवर मारहाण केली. वाघाने हल्ला केल्यांची घटना दाबून टाकण्यांचे उद्देशाने क्षेत्र संचालक गुरू प्रसाद यांच्या इशार्यावरून वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यंनी मरेस्तोवर मारहाण केली.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर, हे प्रकरण आपल्या अंगावर शेकत असल्यांचे दिसून येताच, वनविभागाचे अधिकारी यांनी फुलझरी गावात जावून, तक्रार मागे घेण्यांचा तगादा लावला. तक्रार मागे न घेतल्यास शासनाने उदरनिर्वाहासाठी दिलेले वन​जमिनीचे पट्टे परत घेवू, कोणत्याही आरोपात फसवू अशी धमकी दिली. असा आरोप गावकर्यांनी केला आहे.
वाघाचे हल्यांचे प्रकरणात एकाचा नाहक बळी गेल्यानंतर, वनविभागाने तो खून आहे, हे भासविण्यांकरीता निर्धन आदिवासींना केलेली मारहाण हा वनविभागाच्या आजवरच्या इतिहासाला साजेसा असला तरी, सामान्याना संताप आणणारा आहे. वनविभागाच्या कारवाईची डोणीच्या एका आदिवासींनी ‘सरकारी गुंडानी केलेली मारहाण’ अशा शब्दात व्यक्त केलेली प्रतिक्रिया वनविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.
काय आहे वन विभागाची भूमिका?
याबाबत वनपरिक्षेत्राधिकारी नायगावकर यांच्याशी संपर्क केले असता त्यांनी, गावकर्‍यांनी केलेले सर्व आरोप खोटे ठरविले. आपण गावकऱ्यांच्या बाजूचेच असून, अतिक्रमण काढण्याबाबत कोणतीही धमकी आपण दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
सदर प्रकरणांत गावकरी आदिवासींवर कोणत्याही POR किंवा गुन्हा नोंद नाही, असे वन विभागाकडून समजले.
मध्यंतरी रेंजर्स असोसिएशनचे पदाधकाऱ्यांनीही राजू झोडे यांचेविरोधात पत्रकार परिषद घेऊन सरकारी कामात अडथळा निर्माण करत असल्याचे आरोप केले आहेत.
– विजय सिद्धावार
९४२२९१०१६७