प्रियंका गांधीच्या रद्द झालेल्या दौर्‍यांनी निर्माण केले अनेक प्रश्न!
गडचिरोली जिल्हयातील विद्यार्थीनीना 10 हजार आणि ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्रातील ५ हजार असे एकूण 15 हजार मुलींना इलेक्ट्रिक सायकल वाटप 14 डिसेंबरला अ.भा.राष्ट्रिय कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधीच्या हस्ते वाटप होणार होते. प्रियंका गांधी यांचा दौरा काही कारणांने हुकला, आणि या मुलींना सामाजीक दायित्वाच्या भावनेने वाटप होणार्या इलेक्ट्रीक सायकल वाटपालाही ब्रेक लागला.
प्रियंका गांधी यांचे हस्ते या सायकलीचे वाटप होणार होते. त्यांच्या कार्यक्रमाची तयारीही पूर्ण झाली होती. याचा अर्थ हा कार्यक्रम आयोजीत करणारे विजय किरण फॉंउडेंशनकडे सीएसआर निधीतील 15 हजार सायकलीही आल्याच असणार.. मग या सायकली अजूनपर्यंत का वाटप झाल्या नाहीत? प्रियंका गांधी यांनी आपला दौरा रद्द केला, त्यांची शिक्षा गडचिरोली—ब्रम्हपुरीतील गरीब मुलींना का दिल्या जातेय?
किरण फॉंउडेशन ही राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या, शिवाणी वडेट्टीवार यांची संस्था. या संस्थेला सीएसआर निधीतून 15 हजार इलेक्ट्रीक सायकली किंवा त्यासाठी लागणारा निधी मिळाला. गडचिरोली जिल्हयात एकही बडा उद्योग नसतांना, हा बडा सीएसआर कुणी दिला? हा प्रश्न असला तरी, या निधीतून मिळालेल्या सायकली अजूनपर्यंत गरीब मुलींच्या हाती का आल्या नाहीत? हा महत्वाचा प्रश्न आहे.
बक्षिस वाटपाच्या कार्यक्रमात एखादा पाहुणा किंवा प्रमुख पाहुणा आला नाही तर, अख्खा कार्यक्रमच रद्द केला जात नाही. जे येतील त्यांचे हस्ते हा कार्यक्रम साजरा केला जातो. इथे मात्र कार्यक्रम तर रद्द झालाच, दुसरीकडे गरीब मुलींकरीता दिलेल्या सायकलीही कुठे गायब केल्या गेला कि सीएसआर निधीच परत केला गेला हे समजण्यास मार्ग नाही.
विजय किरण फाउडेंशनचा उद्देश जर,

”शहरी भागात आपण वाचत असतो की “शिकलेली आई घर पुढे नेई”. पण, या भागात शिक्षण प्रसाराच्या प्राथमिक अवस्थेतच असल्याने कित्येक आई आणि त्यांच्या पोटी जन्म घेणारी मुलगी या दोघीही निरक्षरच आहेत.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत १० ते १५ वर्ष मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला जर वेगाने विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल आणि विकासाच्या स्पर्धेत झेप घ्यायची असेल तर महिलांना शिक्षण, शिक्षणासाठी दळणवळण सुविधा आवश्यक आहे, हि बाब शिवानी हिच्या लक्षात आली.

दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या दिशेने पुढील पाऊले टाकत शिवानी हिने सीएसआर निधीतून गडचिरोली जिल्ह्यातील व ब्रम्हपुरी मतदारसंघातील मुलींना इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तिच्या प्रयत्नांना यश आले असून आगामी १४ डिसेंबर २०२१ ला कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील १०,००० व ब्रम्हपुरी मतदारसंघातील ५००० या प्रकारे १५,००० मुलींना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात येणार आहे . शिक्षणासाठी कोसो मैल पायदळ जाण्याचे दुर्दैव आता या १५,००० मुलींच्या जीवनात नसणार हि सर्वात मोठी समाधानाची बाब आहे”

(मंत्री विजय वडेट्टीवार यांचे फेसबुक पोष्टवरून)”

असा असेल तर, कार्यक्रमाची वाट न बघता गरीब मुलींच्या अंगणात इलेक्ट्रीक सायकली पाठविण्यांचे सौजन्य विजय किरण फॉउंडेशन दाखवेल काय? विजय किरण फॉंउडेशन ही जरी खाजगी संस्था असली तरी, ती सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी झालेली संस्था आहे. (सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी झाली नसती तर, त्याना सीएसआर चा निधी मिळाला असता काय?) या संस्थेला तब्बल 30 कोटीचा सार्वजनिक असलेला सीएसआर निधी मिळालेला आहे, त्यामुळेच या सर्व बाबीचा उलगडा होणे आवश्यक आहे. गरीब मुलींना जाहीर केलेली हक्काची मदत देवून, त्यांचे खर्या अर्थानं पालकत्वाची जबाबदारी मंत्री विजय वडेट्टीवारांनी घेणं औचित्याला धरून आहे.
– विजय सिध्दावार
९४२२९१०१९७