बाया रोवन्याला जातात तेव्हा….
————————————-
सूर्य उजाडण्यापूर्वीच पक्ष्यांची फडफड
तेव्हा बाया लागतात कामाला
झाडझुड, सडासारवन,पाणी
सैपाकही करतात आणि
पोरांनाही उठवतात शाळेसाठी.
बांधतात शिदोरी
आणि देतात शेजारी पाजारी आवाज…
झालं का ऽऽ व,चाल ऽऽऽ ना व
लौकर…लौकर!
 निघतात बाया जथ्या- जथ्याने
हातामध्ये शिदो-या घेऊन.
मैल दोन मैल.. कधी जास्तच
चालतच जातात बाया.
भिजवली असते पावसाने जमीन
केलं असते चिखल शेतक-यानं
त्याचा असतो निरोप
रोवन्याचा.
बाया निघून जथ्याने
बांधावर पोहचताच लागतात कामाला
पदर खोचून.
हातात घेऊन धानाच्या रोपांची जुडी
कंबर वाकवून गुडघाभर चिखलात
रोवतात.
वांगी भात जेवण अन
दुपारची घडीभर विश्रांती
झाल पडेस्तो सुरु असते रोवला.ख
चिखलात रुतुन रुतुन निब्बर झालेल्या
ना हाताची ना पायाची असते चिंता त्यांना
झाल पडली की धरतात वाट
घराकडची जथ्या जथ्यानेच.
काळजी घरातील चुलीची
पेटवतात चुल
मांडतात भात पातेल्यात.
चुलीच्या जाळाकडे पाहत –
येत असेल मनात विचार,
असेच आम्ही का जळतोय.
बांध्यातल्या चिखलासारखं
तुडवल्या जातो.
झाल्या चिकल्या दुकली कंबर
कोनाला सांगाच माय!
म्हणत  झोपी जातात.
बाया अशा निघतात रोवन्याला जथ्याने
पण नसते कधी चेह-यावर
उदास भाव.
हासत हासत सुखादुःखाच्या
गोष्टी करत रस्त्याच्या कडेनं
असतात चालत बाया
जसा महादेवाकडे चाललेला पोरा.
रोवन्याच्या जथ्यात असतात-
माय,पोरी, बहिणी, भावजय,
शाळेत जाणारी लेक ही  कधी कधी.
बाया रोवन्याला निघताच
सकाळी सकाळीच  अर्ध गाव उजाड.
रोवन्याच्या बायांचा जथ्या पाहून…
बाया रोवन्यालाच गेल्या नाही तर!
बायांनी टाकलाच बहिष्कार तर!
 असाही विचार चमकून जातो कधी.
बाया निघतात रोवन्याला
तेव्हा, कधी धो धो पाऊस
पांघरतात प्लास्टीकच घोंगडं
थांबतात रस्त्यालगतच्या झाडाखाली
कडाडते वीज
बाया दचकून एकमेकींकडे पाहतात
पता नाही कोणाचे आभार मानतात
अन चालू लागतात मजुरीच्या आशेने
रोवन्याला
बाया बांध्यात भिजतात
बाया कुडकुडतात
बाया घराकडे निघतात
चिल्ल्या पिल्याच्या आशेने.
रोवन्याने थकलेल्या बाया..
सॅटेलाईट चॅनेलवर
नटून थटून भांडणा-या सास्वासुना
दिग्दर्शकाने दाखवलेल्या
 कजाग कपटी बाया
पाहतही असतील
आणि
आपल्या फाटक्या लुगड्या -साडीकडे पाहत
हे काही आपल नाही
कर बापू बंद हे !
असं म्हणून झोपी जातात
दुस-या दिवसाच्या मजुरीच्या आशेनं….
पाऊस न पडून
थांबलेल्या रोवन्यापाहून
बाया करतात चर्चा आपआपसात
लेकरांच्या शिक्षणाची,
धन्याच्या ह्रदयाच्या धडधडीची,
बचत गटाकडून घेतलेल्या उसनवारीची,
भरून न वाहणा-या नदी-नाल्याची,
गुराढोराच्या चा-याची.
पाऊसच नाही आला तर
पिकलच नाही तर.
विचार करून
बाया कासावीस होतात आणि
मोकळ्या शुष्क आभाळाकडे पाहून….
 “गरज बरस प्यासी धरतीपर
फिर पानी दे मौला
चिडीयोंको दाने बच्चोको गुडधानी दे मौला. “
कदाचित अशी आर्त प्रार्थनाही
करीत असाव्यात.
प्रभू राजगडकर
नागपूर