श्रमिक एल्गारच्या आदिवासी महिला नेतृत्व

श्रमिक एल्गार, पूर्व विदर्भात सतत दोन दशकापासून, गरीबांच्या, आदिवासींच्या हक्कासाठी आणि त्यांचे संवैधानिक हक्क मिळवून देण्यांसाठी कार्यरत संघटना म्हणून ओळख आहे. श्रमिक एल्गारच्या बांधणीत आणि लढ्यात महिलांचे योगदान, त्यातही आदिवासीं महिलांचे योगदान उल्लेखनीय आहे. ज्या आदिवासी महिलांनी नेतृत्व करीत श्रमिक एल्गारचा लढा पुढे नेला, अशा काही महिलांचा आज आपण परिचय करून घेवूया

तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा ताई पाटील, सोबत श्रमिक एल्गार संघटनेच्या महिला

000
यात्रिका कुमरेे

सावली तालुक्यातील कोंडेखल गाव. तालुका मुख्यालयापासून दूरवर असलेल्या या गावातील यात्रिका कुमरे संघटेत साधारणत: 2005 नंतर सहभागी झाल्यात. सावली येथील हजारो महिलांचे निराधार योजनेचे अर्ज तहसिल कार्यालयात प्रलंबीत होते. यात यात्रिकाचाही अर्ज होता. यात्रिका विधवा असल्यांने, संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज तहसिल कार्यालयात सादर केला होता. मात्र हा अर्ज लालफितशाहीत अडकला होता. सरकारी काम आणि चार महिणे थांब अशी काहीशी परिस्थिती या अर्जाची झाली होती. घरी म्हातारा बाप, सोबतीला दोन लहानग्या मुली. कशाच्या आधारावर जगवायच्या? संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळेल म्हणून अर्ज केला, मात्र सहा महिण्यांचा कालावधी लोटूनही अर्जावर काहीही कारवाई झाली नाही. गावात कुणीतरी यात्रिकाला सांगीतले, ‘सावलीत एल्गारबाई (पारोमिता गोस्वामी यांची ओळख त्या ग्रामिण भागात एल्गारबाई म्हणून होती) येते, एका झटक्यात तुझा काम करून देते, ते पण फुकटात’
सावलीत दर गुरूवारला बाजार भरतो. त्याच दिवशी संघटनेची सावली तालुक्याची बैठक घेतली जायची, यात्रिकाही या बैठकीत आली, आपले गार्हाणे, तीने बैठकीत सांगीतले. पारोमिता गोस्वामी यांनी एका कार्यकर्त्यासोबत तीला तहसिल कार्यालयात पाठविले, तहसिलदारांनी निरोप दिला. आमदारांनी संजय गांधी निराधार योजना समितीची मिटींग न घेतल्यांने अर्ज मंजूर झाले नाही. पारोमिता गोस्वामी यांनी तहसिलदारांना बजावले, तीन महिण्यांत आमदारांनी मिटींग घेतली नाही तर, असे अर्ज उपविभागीय अधिकारी यांना मंजूरीचे अधिकार आहेत, का पाठविले नाही? या प्रश्नावर तहसिलदार निरूत्तर झालेत, लागलीच पारोमिता गोस्वामी यांनी उपविभागीय अधिकारी यांचेशी बोलून पाठपुरावा केला. पुढील 15 दिवसात तालुक्यातील सर्व निराधारांचे अर्ज निकाली लागले, यात्रिकाबाईलाही अनुदान मंजूर झाले. ही गोड बातमी, यात्रिकाबाईने पारोमिताताईंना लगेच सांगीतली. आपला काम झाल्याचे समाधान यात्रिकाच्या चेहर्यावर होते, मात्र आपल्या सारख्या अनेक गरीब, निर्धन आणि विधवा महिलांना या योजनाचा लाभ घेण्यांसाठी अडचणी येत असल्याचे शल्यही तीचे मनात होते. मनातील सल तीने पारोमिता गोस्वामी यांना सांगीतली, पारोमिता गोस्वामीने तीला स्पष्ट बजावले, ‘मी तुझे काम केले, आता तु दुसर्याचे कर’. नंतर संघटनेच्या प्रशिक्षण शिबीरात येवून, यात्रिकाने निराधार योजना समजावून घेतली. अर्ज कसे भरायचे, कोणते कागदपत्रे जोडायचे, कागदपत्रे कुठून गोळा करायचे वगैरे.. वगैरे… पुढील काही दिवसाच यात्रिका कुमरे सावली तालुक्यातील विधवा निराधार महिलांची ‘नेता’ झाली. अनेक महिलांनी तीच्या माध्यमातून निराधार योजनांचा लाभ मिळवून घेतला.
श्रमिक एल्गारने जिल्हा दारूबंदीचा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच तीने गावात दारूबंदीचा प्रयत्न करून पाहीला. तालुक्यातील महिलांना दारूबंदीसाठी सक्रिय केले. गावात बैठका जाहीर सभा घेतल्या. जिल्हयात दारूबंदी झाली पाहीजे यासाठी 8 दिवस नागपूर कारागृहात जेलमध्ये होती. स्वत:च्या निराधार योजनेच्या लाभासाठी आलेली आणि समाजासाठी दारूबंदीच्या आंदोलनाचे सावली तालुक्याचे नेतृत्व करणार्या यात्रिकाबाईचा संघटनेची प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

000
सुमनबाई टेकाम

सुमनबाई टेकाम, मु.पो. उमरी पोतदार तह. पोंभूर्णा येथील सहीच्या रकाण्यात आंगठा मारणारी, मध्यमवयीन महिला. उमरी पोतदार या गावात श्रमिक एल्गारची सभा प्रविण चिचघरे यांनी लावली. गावात रोजगार हमी योजनेचे काम मिळावे यासाठी ही सभा होती. सभेत सर्वानी गावात रोजगार हमी योजनेचे काम मिळाले पाहीजे, लोकांची उपासमार होत आहे याची चर्चा करीत होते. तेवढ्यात एक महिलांनी आपला लुगडा निट करीत बोलू लागली. ‘या सप्पा लोकांचा जावू द्या ताई, मी का म्हनंतो ते ऐका, तुमी माती काम आणून द्याल, पैसा भेटन, तो पैसा आमचे माणसं भट्टीत टाकणं.. तुमचा काम भट्टीवाल्याचा पोट भरायचा आहे, आधी भट्टी बंद करा… भट्टी म्हणजे, देशी दारूचे दुकान हे नंतर कुणीतरी समजवून सांगीतले.
‘तुझे गावची भट्टी, त्रास तुला आहे, तु का बंद करीत नाहीस?’
पारोमिता गोस्वामी हिंने सुमन टेकाम हिला प्रश्न केला.
‘आम्हाले करता आला असता तर, तुमच्यावरी धाव घेतलो असतो का? अडला हरी गाढवाचे पाय धरी सारखा आता तुमचे पाय धरतो..’
उमरी पोतदार या गावात देशी दारूचे परवानाचे दुकान होते. गावातील महिलांनी पुढाकार घेवून हे दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात यश आले नाही. श्रमिक एल्गार सतत चार वर्ष कायदेशीर लढा दिला आणि उमरी पोतदार येथील देशी दारू दुकानाला सील लागले.
या सर्व प्रक्रियेत सुमनबाई टेकाम हिचा सहभाग उल्लेखनीय होता. दारू दुकान बंद करण्याच्या मतदानात गडबळ होवू नये, मतदान आडव्या बाटलीच्या बाजूनेच झाले पाहिजे यासाठी दिवस—रात्र गावात फिरली. दारू दुकान बंद करण्यांचा जिल्हाधिकारी यांनी निर्णय दिल्यानंतरही, दारू दुकानदारांने मुंबईत जावून कमीश्नर कडून ‘स्टे’ आणला. या विरोधातही ती मुंबईत गेली, तीथेही लढली, पुढे नागपूर हायकोर्टातही उभी झाली आणि गावातील दारू दुकान हटविण्यांची लढाई ती जिंकलीच! या सर्व कालावधीत गावात ग्राम पंचायतीच्या निवडणूका आल्यात, ती दारूबंदीची पॅनल घेवून लढली, जिंकली सुध्दा! प्रोसिडींग बुकवर सही ऐवजी आंगठा मारणारी ती एकमेव सुमनबाई होती. सुमनबाईच्या हातात, अख्खी ग्राम पंचायत होती, मात्र तीने या पदाचा गैरउपयोग केला नाही. ग्राम पंचायतीचा कालवधी झाल्यानंतर, मात्र तीने घरकुलाचा अर्ज केला. तांत्रिक कारणाने तो अजूनही मंजूर झाला नाही. पारोमिता गोस्वामी हिंने काही हितचिंतकाकडून सुमनबाईच्या घरासाठी निधी उभा केला. जन्माला आले तर कुत्रे मांजरही जगतात, मात्र माणूस म्हणून जन्माला आले तर, चार लोक नाव घेतील असा काम करून मरा.. असे तत्वज्ञान सांगणारी सुमनबाई टेकाम ही श्रमिक एल्गारच्या दारूबंदी आंदोलनाची खरी प्रेरणाच ठरली!

000
भिमबाई रामा सिडाम


जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासींच्या गैरआदिवासींने लुटलेल्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी आंबेझरी रोडगुडा येथे बैठक सुरू असतांनाच, राजकुमार चिकटे यांनी सांगीतले कि, येल्लापूर येथील भिमबाई रामा सिडाम या कोलामबाईला गैरआदिवासींनी आठ दिवसाच्या आधी मारून शेत बळकावले. पारोमिता गोस्वामीसह आम्ही येल्लापूर येथील कोलाम गुड्यात गेलो. झोपडीत मरणासन्न अवस्थेत भिमबाई पडली होती. तीला अधिक काही न विचारता, पारोमिता गोस्वामी हीने तीला आधी दवाखाण्यात नेण्यांचा निर्णय घेतला. कोरपणा येथील सरकारी दवाखाण्यात तीला उपचारासाठी नेले, दवाखाण्यात साधी सलाईनही नव्हती. अखेर पारोमिता गोस्वामी यांनी आपल्याकडील 1000 रूपये देवून सलाईन व काही औषधे बोलाविले. दोन दिवसांनी भिमबाई बरी झाली. तीला पारोमिता गोस्वामीने विचारले, ‘येल्लापूरला घरी नेवून देवू का?’ तीने नकारार्थी मान हलविली, ‘नाही ताई, आमच्या वावरातच जातो, मेलो तरी बी जमीन सोडणार नाही’ भिमबाईचा निर्धारच पुढे जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासींच्या जमिनीचा लढा नेटाने लढविण्यांची प्रेरणा ठरली. भिमबाईची केस तयार करून, उपविभागीय अधिकारी विनोद हरकंडे यांचे कोर्टात दाखल केली. भिमबाईच्या बाजूने आर्डर झाला. खुद्द उपविभागीय अधिकारी विनोद हरकंडे, पारोमिता गोस्वामी प्रत्यक्ष भिमबाईच्या शेतात जावून तीचे जमिनीचा ताबा दिला. पुढे काही दिवसातच तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी तीला बैलगाडी, बैलजोडीसह बिजाई दिली.
आपली जमिन आपल्या ताब्यात आल्यानंतर, भिमबाई स्वस्थ बसली नाही, ती इतरही महिलांना संघटीत केली. जमिनीचे प्रकरणे, गैरआदिवासींच्या धमक्यांना न घाबरता, संघटनेकडे आणली, त्यांच्याही जमिनी सोडविली. संघटनेच्या प्रत्येक बैठकीत भिमबाईची हजेरी नक्की असे. जमिनीच्या लढ्यात मार खाणारी भिमबाई पहाडावरील शेवटची महिला होती. अत्यंत साधी, मितभाषी मात्र तेवढीच कणखर असलेली भिमबाई जिवती तालुूक्यातील जमिनीच्या आंदोलनातील प्रेरणा होती.

000
भूमीता रमेश मेश्राम

भूमिता ताई मेश्राम

श्रमिक एल्गारची सुरूवातच चिटकी गावापासून झाली. चिटकी हे भूमिता रमेश मेश्राम हिचे गांव. गोपाळा कवडू गावडे या आदिवासीवर झालेल्या अन्यायातून श्रमिक एल्गारची स्थापना झाली. गोपाळा गावडे याला जेलमधून सुखरूप त्याचे चिटकी गावातील घरी सोडून पारोमिता गोस्वामी सह आम्ही परत येत असतांना, एक काळी सावळी, उंच व मजबूत बांध्याची महिला काही बायकांना सोबत घेत रस्त्यात येवून भेटली. ताई तुम्ही वापस गावात चला, आमच्या गावात बहुत अन्याय आहे. पारोमिताने तीला विचारले, नांव काय ग तुझं? भूमिता! भूमीता रमेश मेश्राम तीने आधी आपला नंतर सोबतच्या इतर बायाचा परिचय करून दिला.
गावात गेल्यानंतर, तीने गावात आदिवासींवर कसा—कसा अन्याय होतोय याचा पाढा वाचला.. या सर्वांवर उपाय म्हणून पारोमिता गोस्वामी यांनी संघटनेचा पर्याय दिला आणि श्रमिक एल्गारचा जन्म तीथेच झाला.
भूमिताचे सासर—माहेर चिटकीच आहे. भूमिताकडे स्वत:चे मालकीची जमिन नसल्यांने, ती स्वत:ला ठलवी म्हणायची. मात्र संघटनेच्या कोणत्याही कामात आपली गरीबी आडवी येवू दिली नाही.
खर्या अर्थात श्रमिक एल्गारच्या निर्मीतीत भूमिताची भूमिकाच महत्वाची ठरली. भुमिता स्वत: संघटनेत आली. सोबत आपला नवरा, भाऊ, भावजय यांनाही सहभागी करून घेतली.
श्रमिक एल्गारने रेशनधारकांसाठी सिंदेवाहीत रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात भुमिताने विशेष भुमिका केली. पारोमिताताईंना पोलिसांनी अटक करू नये म्हणून, पारोमिताताईंना घट्ट कडे करून बसली. तीच्या कृतीने पोलिस पारोमिताताईंना अटक करू शकत नव्हते, अखेर भलावी ठाणेदार यांनी हात जोडीत अटक करवून घेण्याची विनंती केल्यानंतरच, पोलिसांना पारोमिता गोस्वामी यांना अटक करता आली.
या आंदोलनात सहा दिवस आमचेसह भुमिता जेलमध्ये होती. फक्त एकटीच नाही तर आपला नवरा आणि 13 वर्षाच्या घनश्याम या मुलासह कोणतीही कुरबूर न करता जेलमध्ये राहीली. पुढे आपल्या मुलांलाही संघटनेसाठी सोडले. भूमिताचाच मुलगा घनश्याम हा संघटनेचा पुढे महासचिव बनला तर आता उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.
भुमितानी संघटनेच्या सर्व आंदोलनात प्रमुख भुमिका बजावली. जेवढे शक्य तेवढे योगदान दिली. गावा—गावात जावून आपल्या नातेवाईंकात श्रमिक एल्गारचा प्रचार—प्रसार केला.
काही वर्षापूर्वी भूमिताला दुर्धर आजारांनी ग्रासले. याच दरम्यान पारोमिता गोस्वामी यांनी ब्रम्हपुरी विधानसभेची निवडणूक लढविण्यांचा निर्णय घेतला. उमेदवारी अर्ज भरण्यांच्या दिवशी आजारी असलेली भूमितांनी स्वागत मंगल कार्यालयात झालेल्या मोठ्या सभेत दमदार भाषण देवून ताईंच्या कार्याच्या परिचय करून देत विरोधकांनाही सडेतोड उत्तर दिले.. भुमिताजवळ धन नव्हते, नाही मात्र तन आणि मन तीचे संघटनेसाठीच होते, आहे आणि श्रमिक एल्गारच्या लढ्याची तीच प्रेरणा आहे.

छाया सिडाम आणि संगीता गेडाम

000
संगीता अनिल गेडाम

अत्यंत कमी वयात वैधव्य मिळाल्यांने, नैराश्येत असलेल्या संगीता अनिल गेडाम ही महिला निराधार योजनेचा लाभ मिळवून द्यावा यासाठी श्रमिक एल्गारकडे आली. श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते मारोती शेंडे यांनी तीला या कामी मदत केली. श्रमिक एल्गारमुळे आपली अडचण दूर झाल्यांने, पुढे ती दर बुधवारी तीच्या सारख्याच महिलांना, अन्यायग्रस्त महिलांना मूल येथील कार्यालयात आणत गेली. एका—एका महिलांचे प्रश्न सुटत गेले आणि संगीतातील नेतृत्व क्षमतेचा विकास झाला.
संघटनेत आलेल्यांची कामे घेवून तहसिलच्या विविध कार्यालयात जात असल्यांने, अधिकारीही तीने आणलेली प्रश्न सोडवू लागले. पुढे ती, श्रमिक एल्गारची मूल तालुका सचिव झाली. तालुका सचिव पद घेणारी ती पहिली महिला होती. कोणतेही काम आले तर करायचे, नाही म्हणायचे नाही असा तिचा स्वभाव. त्यामुळे संघटनेनी सांगीतलेले प्रत्येक निर्णय तीने कोणतीही कूरबुर न करता मान्य केली.
जिवती तालुक्यात, माणिकगड पहाडावर कोलाम—गोंड आदिवासींवर अन्याय होत असल्यांने श्रमिक एल्गारने तीथे आदिवासींना मदत करण्याचे काम सुरू केले. गैरआदिवासींकडून हल्ले होण्यांची भिती असल्यांने तीथे आदिवासींसोबत काम करू शकणारी महिला तेवढीच हिमंतवान असण्याची गरज होती. संगीता, शरीरात सडपातळ असली तरी, अंगात प्रचंड हिमंत व आत्मविश्वास असल्यांने तीला पहावरील आदिवासींला मदत करण्यासाठी संघटनेने सांगीतले. घरी दोन लहान मुले असतांनाही, तीने ही जबाबदारी स्विकारली. जमिनीच्या प्रश्नासह पहाडावर रेशन, पाणी, आरोग्याच्या प्रश्नावर तीने आदिवासी महिलांना मदत केली. महिलांचे बचत गट तयार करून, त्यांचेत आर्थिक साक्षरता निर्माण केली.
पुढे श्रमिक एल्गारने दारूबंदी आंदोलन केले, यातही संगीताचा पुढाकार लक्षणीय होता. सर्वच आंदोलनात ती हिरीरीने सहभागी झाली. दारूबंदीवर बोलल्याशिवाय, कोणत्याही नेत्यांला चंद्रपूर जिल्हयात भाषण करू द्यायचे नाही असा संघटनेने निर्णय घेतला. सावली येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आर.आर. पाटील यांची सभा होती. या सभेत श्रमिक एल्गारच्या महिला जावू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. संगीता आपल्या सहकार्याना घेवून पोलिसांना गुंगारा देत सभास्थळी पोहचली. आर.आर. पाटील भाषणाला उभे होताच, संगीता जागेवर उभी होत, आधी चंद्रपूर जिल्हा दारूबंदीवर बोला.. नंतर तुमचा भाषण असे म्हणताच, सभेत गोंधळ झाला. आर. आर. पाटील यांनी संगीताला मंचावर बोलावून घेतले. दारूबंदीवर सकारात्मक आश्वासन दिले.
दारूबंदीपूर्वी दारूबंदीसाठी जेलमध्येही संगीता गेडाम गेली होती. दारूबंदी नंतरही अनेक अवैद्य दारू विक्रेत्यांना ती पकडून दिली. तीने पोलिसांत दिलेल्या जबानीमुळे मूल येथील दोन अवैद्य दारू विक्रेत्यांना शिक्षा झाल्यात. या काळात तीचेवर गुन्हे दाखल झालेत, मात्र दाखल गुन्हयामुळे न डगमगता आपले कार्य हसत—हसत करणारी संगीताचे कार्य अनेकांसाठी प्रेरणा आहे.

000
छाया सिडाम

मुळात बांबू कारागीर असलेली आणि बांबू कलेत निपुण असलेल्या छाया सिडाम ही संघटनेशी सहज जुळली. श्रमिक एल्गारने बांबू कारागीरांना हिरवा बांबू उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनात ती सहभागी झाली होती. पुढे ती, निराधार महिलांचे प्रश्न, त्यांचेसाठी मोर्चे, आंदोलने केली व अनेक निराधार महिलांना निराधारांचे अनुदान मिळवून दिली.
श्रमिक एल्गारने गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यात काम सुरू केले. रोजगार हमी योजना, निराधार महिलांचे प्रश्न या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होते. या प्रश्नावर तेथे महिलांसोबत ताकदीने काम करू शकतील असे नेतृत्व चामोर्शी तालुक्यात संघटनेला मिळाले नाही. त्यामुळे य तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून गरीब महिला आदिवासींचे प्रश्न सोडविण्याठी छाया सिडाम हिला चामोर्शी तालुका सचिव पदाची जबाबदारी दिली. छाया सिडाम हिने ही जबाबदारी लिलया पार पाडली.
मूल वरून 60 किमी अंतरापर्यंत बसने तर कधी पायी चालत तालुक्यात श्रमिक एल्गारच्या माध्यमातून लोकांची कामे केली. महिलांना घेवून तहसिल, पंचायत समितीवर मोर्चेही काढले.
चामोर्शी तालुक्यात काम करतांना, चार महिणे महिलांना निराधारांचे पगार मिळाले नव्हते. ही बाब महिलांनी एका बैठकीत छाया सिडाम हिला सांगीतले. छाया सिडाम हिने याबाबत तहसिलदारांकडून माहिती घेतली. निराधारांचे सर्व अनुदान बॅंकेत जमा झाले होते. महिलांना घेवून छाया सिडाम हिने जैरामपूरच्या बॅंकेत गेली. तेथे बॅंक मॅनेजर दुपारी बॅंकेच्या वेळेतच बेंचवर झोपुन असल्यांने दिसून आले. लगेच छाया सिडाम हिने गावात जावून फोटोग्राफरला आणले, त्याला 15 रूपये देवून झोपलेल्या अवस्थेतच बॅंक मॅनेजरचे फोटो काढले. ते फोटो घेवून चामोर्शीला देशोन्नती च्या पत्रकाराला देत, ‘झोडाळू मॅनेजरची’ बातमी प्रकाशीत केली. बातमी प्रकाशीत होताच, बॅंक मॅनेजर खवळले, कोर्टात कारवाईची छाया सिडाम हिला धमकी दिली. माझेवर जी कारवाई करायची ती करा, आधी, बायाचे पैसे त्यांच्या खात्यात टाका म्हणून, मॅनेजरला दम दिला. त्याच दिवशी महिलांचे सर्व अनुदान जमा झाले.
असेच एकदा, घोट येथील आदिवासींची जमिन संजय वडेट्टीवार यांनी बेकायदेशीररित्या ताबा घेतल्यांचे प्रकरण तीने हाताळले. थेट जमिनीत आदिवासीना घेवून जमिनीचा ताबा घेतला. संजय वडेट्टीवार यांनी लगेच पोलिस स्टेशन घोट येथे तक्रार दाखल करीत, आपण विजय वडेट्टीवार यांचे भाऊ असल्यांची ओळख दिली. विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणात पारोमिता गोस्वामी यांचेशी दुरध्वनीवरून चर्चा करीत, आपल्या भावावर अन्याय होत असल्यांचे सांगीतले. मात्र पारोमिता गोस्वामी यांनी त्यांना स्पष्ट सांगीतले कि, माझी कार्यकर्ती जर ती जमिन आदिवासींची आहे हे सांगत आहे याचा अर्थ ती जमिन आदिवासींचीच आहे! पुढे चौकशीत ती जमिन आदिवासींचीच निघाली आणि त्या दिवशी गैरआदिवासी संजय वडेट्टीवार यांचेकडून काढून दिलेली जमिन आजही आदिवासींच्याच ताब्यात आहे. नक्षलग्रस्त भागात जाऊन, बड्या राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताला न जुमानता, हाती जे आहे, त्यातूनच आपले कार्य पुढे नेणारी छाया सिडाम हि संघटनेच्या अनेक कार्यकर्यासाठी प्रेरणा ठरली.

विजय सिध्दावार
मूल, जिल्हा चंद्रपूर
9422910167