‘युध्दात जिंकले, तहात हरले’ या ऐतिहासिक म्हणीची आठवण करून देणारी घटना दोन दिवसापूर्वी घडली.  एक आठवडाभर राज्याच्या राजकारणात चाललेत्या सत्ता संघर्षाचा शेवट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील असाच राजकीय विश्लेषकांचा, माध्यमांचा, राजकीय पक्षांचा कयास असतांनाच, ऐनवेळी भाजपा नेतृत्वाने आश्चर्यकारक निर्णय घेवून सर्वांनाच चकीत केले. पदांचा गेम नेमका उलटा झाला.  हा उलटफेर कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर काळ देईल मात्र वर्तमान परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांचे मजबूत होत असलेले पंख छाटण्याकरीता, ‘मोदी—शहा’नी हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे.  
 
मोदीनंतर शहा हेच समिकरण कायम राहीले पाहीजे यासाठी ‘नरेंद्र नंतर देवेंद्र’ होवू नये यासाठी आताच पावले टाकणे मोदी—शहा यांना गरजेचे होते, ते त्यांनी केले असावे. मूळ मूल निवासी आणि आता नागपूरात स्थिरावलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अगदी लहान वयात राजकीय क्षेत्रात चमकदार कामगीरी केली.  त्यांचे एकूण राजकारणाबद्दल समाजात दुमत असले तरी, त्यांची विद्वता, चाणाक्ष निती, प्रभावी आणि लॉजीकल मांडणी सर्वमान्य आहे. आणि याच कर्तुत्वावर त्यांनी महाराष्ट्राचे पूर्णवेळ मुख्यमंत्री म्हणून कामगीरी केली.   ज्या महाराष्ट्राच्या राजकारणावर पश्चिम महाराष्ट्र म्हणजे, शरद पवार आणि मुंबई म्हणजे ठाकरे परिवार यांचे वर्चस्व होते, त्या महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबईत जावून स्थिर होणे, ही बाब सोपी नव्हती, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राज्यांचे राजकारण आपल्या भोवती केंद्रित केले, ही बाब कुणालाही नाकारता येत नाही. ​मोदी—शहा यांचे सुरूवातीचे आ​शिर्वादाने का होईना, परंतू देवेंद्र फडणवीस हे राज्यातील भाजपाचा ‘चेहरा’ झाले हे.
 
भाजप—शिवसेना युती म्हणून 2019 मध्ये झालेल्या निवडणूकतही त्यांनी यश संपादन केले होते.  बहुमताच्या जादुई आकड्यांपेक्षा कितीतरी अधिक आमदार युतीचे निवडून आले.  मात्र शिवसेनेने ऐनवेळी कॉंग्रेस—राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, आणि ‘मी पुन्हा येईन…’ म्हणणारे देवेंद्र फडणवीस केवळ 48 तासासाठीच आले. नंतर काय झाले हे सर्वांना ठाऊक आहेच.
 
यानंतरच्या घडामोडीत, एकदा इंडियन एक्सप्रेसला मुलाखत देतांना, ते केंद्रीय मंत्री होतील काय? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘जोपर्यंत राज्यात पुन्हा भाजपा सरकार आणीत नाही, तोवर केंद्रात जाणार नाही.’ राज्यात भाजपा सरकार आणायचे, इतर पक्षात तोड—फोड करायची किंवा त्या पक्षातील नाराजीवर लक्ष ठेवून गेम साधायचा असा तिनदा प्रयत्न  फडणवीस यांनी केल्यांचा दावा खुद्द शरद पवार यांनी केला, मात्र राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणूकीच्या निमीत्ताने फडणवीस यांना डाव टाकण्यांची संधी मिळाली आणि या संधीचे त्यांनी सोने केले.  ​अधिकची मते नसतांना, एक राज्यसभा आणि एक विधान परिषद सदस्य निवडूण आणीत त्यांनी राजकीय कौशल्य सिध्द केले.  केवळ मतदानच नाही तर आकड्यांचे आकडेमोडही त्यांनी अचुक करीत आपले लक्ष साध्य केले. नंतरच्या काही क्षणात शिवसेनेतही आजवरच्या इतिहासात सर्वात मोठी फूट पाडली. जवळपास सत्तर वर्षाच्या शिवसेनेचे अस्तित्व राहील काय? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. 
 
फडणविसांनी पश्चिम महाराष्ट्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करीत, शरद पवारांना शह देण्यांचा प्रयत्न केला.  शिवसेना खिळखिळी करीत, मुंबईतही वर्चस्व निर्माण करीत, पूर्ण महाराष्ट्र भाजपाच्या कक्षेत आणले.  केवळ राज्यातच नाही तर, देवेंद्र फडणवीस यांनी बिहार राज्यातील जबाबदारी घेतल्यानंतर, त्या राज्यातही भाजपाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले.  गोवाचे प्रभारी म्हणून काम करीत, गोवाही भाजपाला जिंकून दिले.  थोडक्यात राज्यात आपले पाय मजबूत करीत, राष्ट्रिय राजकारणात यश मिळविणारे देवेंद्र फडणवीस यांना येथेच थांबविले नाही तर, भविष्यात देशाचे राजकारण गुजरात वरून महाराष्ट्रात येईल अशी भिती तर भाजपाच्या वरिष्ठ वर्तुळाला वाटली नसावी ना? असे प्रश्न उपस्थित होत आहे. कदाचित याचे उत्तर ‘होय’ असेच असावे.  कारण या सर्व घडामोडीत देंवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे वाटत असतानाच, आणि सरकार स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांचेसह ते राज्यपालाना भेटल्यानंतर, घेतलेल्या पत्रकार परिषदेत, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहतील असे आश्चर्याचा धक्का दिला. मात्र हे सांगताना, त्यांनी आपण पदाचे लालची नाही किंवा सत्तेचा आपण स्वत:हून त्याग करीत असल्यांचा भाव आणला. कदाचित त्यांचा हा ‘भाव’च केंद्रीय वरिष्ठांना आवडले नसावे.  कारण आपण सरकारच्या बाहेर राहणार हे जाहीर केल्यानंतरही, त्यांना इच्छा नसतांनाही दिल्लीतून उपमुख्यमंत्री बनविले.  उपमुख्यमंत्री पदाचे आदेश त्यांनी मान्य केले असले तरी, त्यांचा चेहरा हा त्यांचा अपमान केला जातोय हेच सांगत होते.
 
राज्यातील अनेक भाजपा नेते, आपले पंख देवेंद्र फडणवीस यांनी कापले असे सांगत होते, आहेत.  आता मात्र ज्यांना माध्यमांनी ‘वेटिंग पीएम’ ‘चाणाक्य’ म्हणून उपमा देवून, त्यागमुर्ती करीत त्यांची प्रोफाईल वाढविण्यांचे काम करीत होते, त्याच फडणविसांना केंद्रातील ‘चाणाक्य’ अमीत शहा असेपर्यंत, ‘केंद्रात नरेंद आणि राज्यात देवेंद्र’ असेच धोरण मान्य करावे लागेल असे सुचित केले आहे.  देशातील एका महत्वाच्या मोठ्या राज्यात विरोधकांना भुईसपाट करणे हे काम वाटते तेवढे सोपे नव्हते, देवेंद्र फडणविसांनी ते केले, युध्द जिंकले मात्र वरिष्ठांसोबतच्या तहात ते हरले असेच म्हणावे लागेल.
तरी आजून पुष्कळ खेळ बाकी आहे. पुढे कोणते न्यायलायीन आणि राजकीय डावपेच खेळल्या जातील आणि त्याच्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय राहील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
 
विजय सिद्धावार
९४२२९०९६११