चंद्रपूर जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले व फिस्कुटी ग्रा.प. सरपंच नितीन गुरनले
 
 
पुत्रप्रेमापोटी महाभारतात धुतराष्ट्राने आपले राज्य गमाविले. महाभारतातील हे उदाहरण नजरेसमोर असतांनाच, भाजपाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरूनुले यांचे नितीन या पुत्रप्रेमापोटी जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता गमावेल काय? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.  फिस्कुटी या जि.प.अध्यक्षा सौ. संध्याताई गुरूनुले यांचा गाव. या गावचे सरपंच म्हणून, त्यांचे पुत्र नितीन गुरूनुले निवडून आले आणि जिल्हा परिषदेची तिजोरीच या गावासाठी खुली करण्यात आली. गावच्या विकासासाठी निधी देणे ही बाब गैर नसली तरी, एकाच मध्यम वस्तीच्या गावासाठी तालुक्याचे वाट्याला आलेल्या निधीपैकी तब्बल 52 टक्के पैसा एकाच गावावर खर्च करणे (यातील प्रत्यक्षात विकासावर होणारा खर्च किती आणि कमीशन किती हा भाग वेगळा) निश्चितच निती आणि तत्चाला धरून नाहीच तर, भाजपाचेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सबका साथ, सबका विकास’ धोरणालाही तिलांजली देणारा आहे.
 
मूल तालुक्यातील (ग्रामीण)  लोकसंख्या ८९,१६२ इतकी आहे. तालुक्यातील फिस्कुटी गावची लोकसंख्या २३२४ आहे. म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत फिस्कूटी गावात केवळ २ टक्के लोक राहत असताना निधी मात्र तब्बल 52 टक्के देण्यात आला आहे.
 
मूल तालुक्यात 48 ग्राम पंचायत आहेत. त्यातील फिस्कुटी एक ग्राम पंचायत. हे गांव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचे मुळ गाव असल्यांने या गावाला झुकते माप मिळणे हे क्रमप्राप्त असले तरी, अख्खी जि.प.ची तिजारी झोकून देणे, हा भ्रष्टाचाराचा नवाच प्रकार आहे.  नरेंद्र मोदी यांचे ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा!’ या घोषणेचीही पायमल्ली करणे आहे. सौ. संध्या गुरूनुले या विद्यमान राजोली—मारोडा या जिप गणाच्या सदस्या आहेत.  या गणातील गावांनी त्यांना जिपमध्ये लोकप्रतिनिधीत्वाची दोनदा संधी दिली आहे.  तरीसुध्दा आपल्या मतदार संघातील गावाकडे दुर्लक्ष करून, पुत्र प्रेमात, जात प्रेमात संपूर्ण सत्तेचा गैरवापर करणे, हा त्यांनाच निवडूण देणार्या मारोडा—राजोली गणातील मतदारांचाही अपमान आणि विश्वासघात आहे.
भारतीय राज्यघटनेत समानतेचे तत्व आहे. विकासात समानता असावी असाही त्याचा एक अर्थ आहे.  फिस्कुटी पेक्षाही दुर्गम आणि अविकसीत गावे असतांनाही, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे अचानक फिस्कुटी प्रेम हे निश्चितच निषेधार्ह आहे.  अचानक यासाठी कि, मागील अनेक वर्षापासून संध्याताई हया जिपच्या अध्यक्षा आहेत, मात्र फिस्कुटीवरील निधीची बरसात, त्यांचे पुत्र सरपंच झाल्यानंतरच झाली आहे.
 

फिस्कुटीला झुकते माप?
 


 
जिल्हा परिषदेत ग्राम विकासासाठी असलेल्या जिल्हा निधीतून समतोल विकास साधायचा असतो.  मूल पंचायत समिती अंतर्गत मागील एक वर्षात 2,86,29260 (दोन कोटी शहानशी लाख एकोणतीस हजार दोनशे साठ रूपये) ग्राम पंचायती मार्फत विविध विकास 187 कामासाठी मंजूर करण्यात आले.  एका गावाला सरासरी 3 कामे अपेक्षीत होते.  मात्र पुत्रप्रेमात आंधळे झालेल्या जिप अध्यक्षांनी चक्क फिस्कुटी या एकाच गावाला 94 कामे मंजूर केली. या एकाच गावावर 1,50,81,200 (एक कोटी पन्नास लाख, एक्यांशी हजार दोनशे) रूपये मंजूर करीत, इतरांवर अन्याय केला.  एरवी पक्षभेदातून असा भेदभाव होतो, मात्र येथे आपला मुलगा सरपंच हाच क्रायटेरिया लावला आहे काय? आपल्या मुलांसाठी सत्तेचा वापर (कि गैरवापर?) करणे हाच भाजपाचा सबका साथ… आहे काय?
 
मराठीत एक म्हण आहे, ‘तळे राखिल तो पाणी चाखील’, इथे तर अध्यक्षबाईने अख्खा तलावच गिळकृंत केला आहे.सत्तेचा गैरवापर कसा करावा याची शिकवण सध्या जिल्हा परिषदेकडून घेता येईल.  फक्त निधी वाटपच नाही तर, योजना वाटपातही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी दबाव तंत्राचा वापर करीत, अर्ज न करणार्या आपल्याच जातबांधवाना बेकायदेशीर जिप सेस फंडाचा लाभ मिळवून दिला आहे.  हे करतांना किमान नियमाची बुज राखणे क्रमप्राप्त आहे.  मात्र एकदा सत्ता अंगात शिरली कि, हम करेसो कायदा.. सारखी परिस्थिती निर्माण होते.  विद्यमान जि.प. अध्यक्षांची परिस्थिती सध्या याहून वेगळी नाही.
 
जि.प. अध्यक्षा सौ. संध्या गुरूनुले या भाजपाच्या दबंग महिला नेत्या आहेत.  त्या भाजपाकडून आमदार पदाच्या संभाव्य उमेदवार म्हणूनही गणल्या जाते. अशा परिस्थितीत जि.प. अध्यक्षानी पुत्रप्रेमात, जात प्रेमात आंधळे होवून शासकीय निधीचा गैरवापर करणे निश्चितच अनाकलनीय आहे. उद्या त्या आमदार झाल्यात तर, सगळा आमदार फंड फिस्कुटीलाच देतील काय? सगळ्या योजनांचा लाभ स्वत:च्या जातबांधवानाच देतील काय? ओबीसी मधीलच इतरही गरजू आहेत.. याची त्यांना जाणीव नसेल काय?  एकट्या फिस्कुटीच्याच मतदानावर त्या आमदार होतील काय? असे असंख्य प्रश्न या निमीत्ताने निर्माण होत आहे.  इतर गावातील गावकर्यांना, इतर जातीच्या जनतेला ला सत्तेतील वाटा, विकासाच्या योजना  द्यायचा नसेल तर, अशांनी सौ. संध्याताईंना मते का म्हणून द्यावे?
 
बरं एकट्या फिस्कुटीला निधी देतांनाही मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होईल याचीही तरतूद करून ठेवली आहे, उदाहरणच द्यायचे झाले तर, फिस्कुटी ग्राम पंचायतीला फर्नीचर पुरविण्याकरीता 1,20,000/— (एक लाख वीस हजार) मंजूर केले तर, परत तशाच कामासाठी, स्टील खुर्ची पुरविण्यांकरीता 1,80,000/— (एक लाख, अंशी हजार) रूपये मंजूर करण्यात आले आहे.  सात सदस्यांचे ग्राम पंचायतीत असे किती लोक बसणार आहेत कि, ज्याकरीता 3 लाख रूपयाचे फर्नीचर खरेदी करणार आहेत?  याच ग्राम पंचायतीच्या रंगरंगोटीकरीता तब्बल 2,40,000/— (दोन लाख चाळीस हजार) खर्च करणार आहे.  वाचनालय फर्नीचर करीता 1,20,000/— (एक लाख वीस हजार), परत त्याच कामाकरीता 4,20,000/—  (चार लाख वीस हजार) म्हणजे म्हणजे एकट्या वाचनालयाचे फर्नीचर करीता 5,60,000/— (पाच लाख साठ हजार) रूपये मंजूर करवून घेतले आहे.  अगदी नागपूर सारख्या महानगरातील वाचनालयालाही एवढा फर्नीचर लागणार नाही त्यापेक्षा महागडे आणि अधिक फर्नीचर फिस्कुटीच्या कोणत्या वाचनालयात लागणार आहे? असे अनेक उदाहरणे आहेत, ज्यात एकाच कामाकरीता दोनदा—तिनदा निधी दिल्या गेला आहे.  अर्थातच या पैशातून फिस्कुटीच्या विकासापेक्षा स्वविकासाचीच तरतूद केली असे म्हणणे चुकीचे कसे होईल?
 
‘बहती हुई गंगा पर हात पसर ले, हात आये अवसर का लाभ उठा ले’ ही म्हण सार्थ करणारी, जिप संध्या गुरूनुले यांचे पुत्रप्रेम लोकप्रतिनिधी कसा नसावा याचे मुर्तीमंत उदाहरण आहे.
 
 
– विजय सिद्धावार
९४२२९१०१६७