काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, पदविभूषण खासदार शरद पवार यांची मूल येथे सभा संपन्न झाली. शरद पवार यांचे विदर्भ दौर्यानिमीत्त शेतकरी, कामगार मेळावा घेण्यात आला. नावांत जरी शेतकरी आणि कामगार असले तरी, भाषण मात्र राजकीयच होते. अपवादानेच एखादा शब्द शेतकर्यांचा आला, कामगार शब्द तर साहेबांच्या तोंडीही निघाला नाही.
मागील काही दिवसापासून या दौर्यांची राष्ट्रवादीकडून जयत तयारी सुरू होती. चंद्रपूर जिल्हयातील आगामी दौर्याचा भाग म्हणून वातावरण निर्मीती आणि पूर्वतयारी करीता खासदार सुप्रिया सुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री तसेच जिल्हयांचे राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री प्राजक्त तानपुरे यांनी कार्यक्रमाचा धडाका लावला, बैठका घेतल्या. मात्र साहेबांच्या बहुचर्चित सभेला फारसा जनसमुदाय जमू शकला नाही किंवा जमविताही आला नाही. मूल येथील सभेचे रिकाम्या खुर्चाचे फोटो राष्ट्रिय नेत्यांचे अपमान करणारेच आहे. खासदार शरद पवार यांचे आगमनानिमीत्त शहरात जेवढया संख्येत बोर्ड, बॅनर लावण्यात आले, तेवढ्या संख्येत लोकही आले नसल्यांचे चित्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचे अपयश अधोरेखित करणारे आहे.
विदर्भात आणि जिल्हयातही राष्ट्रवादी पक्षाचे स्थापनेपासून बडे नेते पक्षात सहभागी झाले. हे बडे नेते फक्त पैशाने बडे होते, प्रत्यक्षाात यांचे मागे जनाधार नव्हता, हे हळूहळू सिध्द झाले. कॉंग्रेस—राष्ट्रवादीच्या युतीतही या पक्षाला जिल्हयात फार काही करता आले नाही किंवा स्वबळावर लढूनही राजकीय लाभ मिळविता आले नाही. याचाच अर्थ, जिल्हयातील जनता शरद पवारांच्या विचारावर श्रध्दा ठेवत नाही असा घ्यायचा काय?
चंद्रपूर जिल्हयात भाजपा—कॉंग्रेस सध्यातरी बरोबरीत आहे. राष्ट्रवादी सध्या लेटरपॅडवर आहे. पैशाने माहोल तयार केल्या जात असला तरी, मतदार मात्र राष्ट्रवादीपासून दूरच आहे, हे कालपर्यंतचे चित्र होते, आजही हेच चित्र कायम असल्यांचे मूल येथील रिकाम्या खुर्चानी दाखवून दिले.
शरद पवार हे भारतीय राजकारणातील दिग्गज नेते, माजी केंद्रिय कृषीमंत्री, माजी सरंक्षण मंत्री, राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री राहीलेले व्यक्तीमत्व. पंतप्रधानाच्या शर्यतीतील अग्रणी असे नेते आहे. देशाने त्यांना पदभूषण दिले आहे. मात्र आभाळाएवढया उंचीच्या व्यक्तीचे कार्यक्रम तेवढ्याच उंचीचे करण्यास जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य अपयशी ठरले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य हे बेरजेचे राजकारण करून, पक्ष वाढविण्यांऐवजी, वजाबाकीचे राजकारणात इंटरेस्ट घेत असल्यांने, अनेकांनी वेगवेगळया पक्षाचा सहारा घेतला आहे. पक्षातीलही 90 टक्के पदाधिकारी वेगळया दिशेने आणि राजेंद्र वैद्य वेगळया मार्गाने जात असल्यांचा फटका साहेबांच्या सभेला बसला.. असे पक्षात काम करणार्यांनीच खुलासा केला. मागे एकदा मूल येथे पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आले असता, रामलीता भवनातील कार्यक्रमात, मूल येथील राष्ट्रवादीच्या जून्या कार्यकर्त्यांनी राजेंद्र वैद्य यांचेवर पक्षपाती आणि जातीयवाद करीत असल्यांचा थेट आरोप केला होता. राजेंद्र वैद्य यांचे याच स्वभावामुळे तर साहेबांची सभा फलाप झाली नसेल?
विदर्भात पाय पसरायला राष्ट्रवादीला संधी मिळत नाही. विदर्भात हा पक्ष जेमतेम आहे. विदर्भाचा विरोध हेही एक कारण असू शकते. राष्ट्रवादीकडून विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्यांचे खुद् गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूरातील पत्रकार परिषदेत सांगीतले. वैद्यानिक विदर्भ विकास महामंडळावर नेमणूका न करता, हे महामंडळ राजकीय हेतूनेच नष्ट केल्यांची अप्रत्यक्ष कबुली उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिली होती. या पार्श्वभुमीवर पवार साहेबांना अचानक विदर्भातील जनतेची आठवण कशी झाली? कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, राष्ट्रवादीचे एकमेव दुकान (दुकान हा शब्द राष्ट्रवादीसाठी तसाही चपखल बसतो) बंद करण्यांची घोषणा केली, म्हणून तर हा दौरा नाही ना? तसे असेलही तरी, सभेला मिळणारा प्रतिसाद पहाता, नवे दुकान तयार होवू शकेल काय? हा नवा प्रश्न निर्माण होत आहे.
चंद्रपूर जिल्हयातील दारूबंदीमुळे, जनता—परेशान आहे. ही दारूबंदी उठल्यास, जनता राष्ट्रवादीला डोक्यावर घेईल. राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यांकरीता, लिकर लॉबीच्या पैशाचाही उपयोग होईल असाही युक्तीवाद उपमुख्यमंत्री तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजीत पवार यांचेकडे करण्यात आला होता. या युक्तीवादात तथ्यही होते. जिल्हा लिकर असोसिएशनचे अध्यक्ष खुद्द राष्ट्रवादीचे होते. त्यांचे मागणी आणि पाठपुराव्यानंतर, जिल्हयातील दारूबंदी उठविण्यात आली. मात्र दारू विक्रेत्यांनी राष्ट्रवादीला काय दिले हा वेगळा प्रश्न असला तरी, साहेबांच्या सभेला बेवड्यानीही साथ दिली नाही, हे रिकाम्या खुर्चानी दाखवून दिले
दोन दिवसापूर्वी अवकाळी पावसामुळे मूल, सावली तालुक्यातील धान उत्पादक शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. धान कापुन चुरणे करण्यांच्या बेतात असलेल्या शेतकर्यांचे तोंडातील घास निसर्गाने हिरावून नेला. शरद पवार हे शेतकर्यांचे जानते राजे म्हणून ओळखल्या जाते. ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र, कोकणात निसर्गाच्या कोपात शेतकर्यांची झालेली नुकसान पाहण्याकरीता, पवार साहेब थेट बांधावर जातात, त्याच प्रमाणे, ऐन मार्गात असलेल्या शेताची झालेली नुकसान थेट बांधावर जावून अवकाळग्रस्तांना दिलासा देता आला असता. अर्थात हा प्रश्न जिल्हाध्यक्षांनी पवार साहेबांपुढे मांडून तसे नियोजन करणे अभिप्रेत होते. मात्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी हा प्रश्न पवार साहेबांपुढे ठेवून, बांधावर नेण्यांचे नियोजन केलेच नसावे अशीच शक्यता वाटते. तसे असेल तर, ही जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांची कृती धान उत्पादक शेतकर्यांवर अन्याय करणारी ठरते, आणि हा प्रश्न त्यांनी पवार साहेबांपुढे मांडूनही, पवार साहेबांनी दुर्लक्ष केले असेल तर, राजेंद्र वैद्य यांचे जिल्हाध्यक्ष पदाचे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
जिल्हयातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर खा. शरद पवार साहेबांच्या सभेला मोठी गर्दी जमविता आली असती, मात्र राष्ट्रवादीने ही संधी गमाविली आणि रिकाम्या खुर्चाचे फोटो वायरल झाले.
– विजय सिध्दावार, मूल
9422910167