२००८ , ऑगस्ट च्या ३१ तारखेला चंद्रपूर जि.प.मध्ये पुन्हा एकदा एडीशनल सीईओ म्हणून रुजू झालो. कार्यरत असणा-या सीईओनी माझी बरीच माहिती काढून ठेवली होती. भेट झाल्यावर पहिला प्रश्न, “कितने साल है रिटायर को “. बाकी जुजबी बोलण झाल्यावर मी माझ्या कामाला लागलो. माझी एक सवय राहीली होती. कामाशिवाय बाॅस कडे जावून अकारण गप्पा करण्याची हौस नव्हती, तशी सवयही नव्हती. पण बाॅसने बोलावले तर तात्काळ हजर राहत होतो. अर्थात कार्यालयात असल्यावर. काही अधिकाऱ्यांना बाॅस चे कक्षात अकारण जावून बसणे, लावालावी करणे, आर्थिक हितसंबंध दृढ करणे अशी सवय असते. असा माझा अनुभव आहे.

 
चंद्रपूरमध्ये तेव्हा २००८-१० मध्ये जे सीईओ होते, ते महाभाग फारच ‘महान ‘ होते. पदाधिकाऱ्यांना वाटेला लावणे. स्थायी समिती, अन्य महत्वाच्या सभाना दांडी मारणे, अधिका-यांना सभेला जाण्यापासून रोखणे; अधिकारीही शासन आदेश असल्याप्रमाणे आज्ञा शिरसावंद्य मानत असत. प्रभार न देताच आठवड्यापेक्षा जास्त दिवसाच्या प्रशिक्षणाला जाणे. (तेव्हाचे आयुक्त ही कसे काय सहन करत होते. याच आश्चर्यच आहे.) प्रशिक्षण ठिकाणी फाईल्स मागवणे. ऑफीशियली मान्य नसतांना एक्स्ट्रा गाडी कायमरुपी कुटुंबासाठी वापरणे. त्याचे लाॅगबुक अन्य अधिका-याकडून भरुन घेणे. कर्मचारी संघटनाना हाताशी धरुन पदाधिकाऱ्याविरुध्द भडकावणे. कर्मचारीही आदेश शिरसावंद्य मानून तसे वर्तन करीत. मात्र एका पदाधिका-याच बिझीनेस मेतकूट चांगलच जमल होत. तर अशा या “महान ” सीईओ च्या काळात २००८चे सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात शाळात, अंगणवाडीत जेवण तयार करणा-या बचत गटाच्या महिलांनी त्यांच्या मानधनासाठी आंदोलन केले होते.
 
सातआठ महिन्याचे मानधन थकीत होते.जि.प.समोरील शहरात जाणा-या मुख्य रस्त्यावरच रस्ता बंद आंदोलन श्रमिक एल्गार चे नेतृत्वात सुरु केले. पारोमिता नेतृत्व करीत होत्या.त्या दिवशी मी भद्रावती पं.स.च्या दौऱ्यावर होतो. सीईओ नी बाहेर येवून आंदोलकांशी प्रत्यक्ष चर्चा करावी अशी आंदोलक महिलांची आग्रही मागणी होती. पण “महान”सीईओ स्वतःही जात नव्हते व विषयाशी संबंधीत अधिका-यालाही जावू देत नव्हते. किंवा आंदोलक महिलांना चर्चेसाठी निरोपही देत नव्हते. आंदोलक महिलांनी अधिक उग्र रुप धारण केले होते.अशातच कोणीतरी पारोमिताला मी एवढ्यातच एडिशनल सीईओ म्हणून रुजू झाल्याचे सांगितले.
 

माझे आणि श्रमिक एल्गार चे संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण होते-आहे. पारोमिताने राजगडकर साहेबाना पाठवा. आम्ही त्यांचेशी बोलू. अशी मागणी, विनंती केली वाटते. मी तर मुख्यालयात नव्हतो. भद्रावती येथे बांधकाम विभागात होतो. तेथे त्या “महान ” सीईओचा भ्रमणध्वनी आला. “अरे आप कहां हो!,” मी -भद्रावती में..क्यों सर!”


“अरे वो आंदोलनवाले आपसे बात करना 
 चाहते “. मी-“सर वो मेरा सब्जेक्ट नही है.” “आप और डेप्युटी सीईओ का सब्जेक्ट है. मै क्या कर सकता हूं!”

सीईओ- “अरे नही वो आपसेही 
बात करना चाहते. जल्दी आ जाओ.. ठीक है सर ” आणि मी अर्ध्या तासात चंद्रपूरात जि.प.मध्ये पोहचलो. सीईओला भेटलो. ते म्हणाले, “आपको कैसे जानते वो. आपसेही क्यो बात करना चाहते है” मी – “सर पारोमिता मुझे जानती है.मै उनसे वाकीफ हूं” 
“ठिक है! देखो जरा”

मी सीईओ च्या कक्षातून बाहेर पडलो आणि आंदोलक महिला बसलेल्या रस्त्यावर गेलो. प्रश्नावर चर्चा केली. प्रथम त्या जि.प.त यायलाच तयार नव्हत्या. त्यांचा आग्रह सीईओ ला येवू द्या. मी म्हणालो, ‘आपण आत जावून चर्चा करू या. माझी विनंती आहे.’ पारोमिता काही प्रमुख आंदोलक महिलासह सीईओ चे कक्षात आले. चर्चा सुरू झाली. 
 
रक्कम का थकीत आहे ?.हेडक्वार्टर ने रक्कम ब्लाॅकवर का नाही पाठवली. निधी उपलब्ध आहे की नाही. यावर बरेच चर्चा झाली. महिला-बाल कल्याण विभागाच्या डेप्युटी सीईओ चे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. हे माझ्या लक्षात आले. जेवढा निधी आहे तेवढा पाठवून काही पेमेंट करता येईल उर्वरीत पेमेंट ची लेखी हमी सीईओ नी द्यावी, अशी पारोमिता व आंदोलक महिलांची मागणी होती.
 
नेमक सीईओ त्याला तयार नव्हते. खरेतर सीईओ नी त्याची स्वतःची विश्वसनीयता सिध्द करायची वेळ होती. पण ते भयानक इगोइस्ट. त्याला तयार होईना. शेवटी मी म्हणालो डेप्युटी सीईओ च्या सहीने लिहून देवू. त्याला सीईओ तयार झाले. हे करता करता संध्याकाळ झाली. रात्र होवू लागली. आंदोलक महिलांनी जि.प. आवारात गर्दी केली होती. त्यांचे आंदोलन यशस्वी झाले होते. पण सीईओ चा इगो दुखावला असल्याचे दिसलेय. अद्यापही महिलांची गर्दी जि.प.च्या मुख्य दारावर होती. ती हळू हळू पांगत होती .सीईओला त्यांचे गाडी पर्यंत जाण्यास कोणतीही अडचण नव्हती. सोबत पोलीस बाॅडीगार्ड होताच. (सीईओ ला बाॅडीगार्ड का देतात अद्यापही कळले नाही,की स्टेटस सिंबाल झाले!) 
पण त्या “महान “सीईओ ने मागील दाराने गाडी लावण्यास फर्मान सोडले. आणि गाडीत बसून मागच्या दाराने अक्षरशः पळून गेल्या सारखेच गेले. अन तेव्हा पासून त्या महान माणसाने माझ्यावर जो डूख धरला तो पराकोटीचा होता…..
 
प्रभू राजगडकर
 
‘Author has served as Additional Chief Executive Officer, Zila Parishad Chandrapur.