वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

गावाची नी मानवाच्या विचारांची केली स्वच्छता

नतमस्तक त्या महामानवास रचिली ज्यांनी “ग्रामगिता”.
तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे. आई चे नाव मंजुळादेवी. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजीअमरावती जिल्ह्यातील यावली या छोट्याश्या गावी झाला. त्यांचे आजोळ वरखेड. त्यांना बालपणापासून ध्यानधारना आणि कीर्तन यात आवड होती. त्यात ते रममाण होत असत.अंधश्रद्धा आणि जातीभेदाचे निर्मूलन करण्याकरिता त्यांनी खंजिरी घेऊन गावोगावी कीर्तन करत असत.

“या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे. ” असा राष्ट्रात बंधुभाव निर्माण करण्यासाठी च राष्ट्रसंतांचा जन्म झाला असे वाटते. तुकडोजी महाराज हे महाराष्ट्र राज्यातील आध्यात्मिक संत होते. त्यांचे संपूर्ण
जीवन धर्म, पंथ यापासून कोसो दूर असून समाजसेवेला समर्पित होते .

तुकडोजी महाराजांचा सुरुवातीचा काळ रामटेक, सालबर्डी, रामविधी आणि गोंदोळा या घनदाट जंगलामध्ये व्यतीत झाला. ते अडकुजी महाराजांचे शिष्य होते.

राष्ट्रसंतांनी आपल्या कीर्तनातून गावाचा विकास कसा होईल याचे ग्रामगीतेतून विशेष वर्णन केले आहे. राष्ट्रसंतांचा केंद्रबिंदू खेड्यातील माणूस होता परंतु यात ग्राम उन्नतीसाठी येणाऱ्या सर्व घटकांचा समावेश आहे. त्यात आदर्श दिनचर्या, आदर्श खानपान, व्यसनमुक्ती, जीवन जगण्याची कला, देव आणि देव देवळे, ग्रामीण अर्थव्यवस्था, शिक्षण कला क्रीडा राजकारण समाजसेवा एकूणच मानवाचं जीवन कसं असावं याचं शिक्षण ग्राम गीतेतआहे. ग्रामगीते मध्ये एकूण 41 अध्याय, 4675 ओव्या, अखेरचा अध्यायाचा अपवाद वगळता त्यापूर्वीच्या अध्यायाचे आठ पंचक केले आहेत.ग्राम उन्नतीची तळमळ ग्रामगीतेतून आर्त उद्गारा प्रमाणे निघते. “ग्रामगीता” म्हणजे ग्रामसंस्कृती आणि ग्रामविकासाचे नितळ रूप होय. राष्ट्रसंतांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक गाव सुखी, समृद्ध व्हावा परस्परांमध्ये स्नेह निर्माण व्हावा, श्रमिकांना सन्मान मिळावा ग्रामीण जीवनात समृद्धी आणण्याचा मार्ग ग्रामगीतेतून मानवास मिळतो. ग्रामगीता ग्रामदेवतेस अर्पण केली आहे.

गावात बळकट व संरक्षण संघटन कसे असावे हे आपल्या शब्दात राष्ट्रसंत मांडतात, ” जेव्हा कार्यकर्ते होती आळशी | त्यात उपभोगाची वाढे खुशी | तेव्हाच अंतर पडे गाव शिवेच्या” || ग्राम उन्नतीच्या प्रत्येक समस्येवर प्रत्येक घटकावर राष्ट्रसंतांनी खूप मौलिक विचार मांडले आहेत. ”

शिक्षकांविषयी राष्ट्र संत लिहितात, ” ओळखोनी गावाची जबाबदारी, शिक्षक जिव्हाळ्याचे काम करी| तरीच गावहोई स्वर्गपुरी | न पडे जरुरी कोणाची” ||

राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत व्यतिरिक्त अनेक लेखन केले आहे. त्यांच्या या महान कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना  “राष्ट्रसंत” या उपाधीने सन्मानित केले. भारतीय डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ तिकीट प्रकाशित करून त्यांना सन्मानित केले आहे. त्यांचा स्मरण सन्मानार्थ नागपूर विद्यापीठाचे नामकरण” राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ” असे ठेवले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रसंतांनी आणि स्वातंत्र्यानंतरही देशसेवा केली, 1941 साली “भारत छोडो आंदोलनात ” त्यांनी हिरीरीने भाग घेतला. नागपूर पासून 120 किमी अंतरावर असलेल्या मोझरी या गावी राष्ट्रसंतांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तुकडोजी महाराजांनी ग्रामीण भागाच्या पुनर्निर्मानीवर लक्ष केंद्रित केले. आचार्य विनोबा भावे यांच्या  भूदान आंदोलनात देखील सहभाग घेतला.

विविध भजनातून त्यांनी परखड मत मांडले आहे. “मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव | देवा अशानं भेटायचा नाही हो | देव बाजारचा भाजीपाला नाही हो “|| ग्रामगीता केवळ आदर्शवादाचा पुरस्कार करीत नाही तर आदर्शाने जीवन कसे जगावे हे सांगते. स्त्रियांविषयी राष्ट्रसंत लिहितात,” जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी* | ऐसी भरलेली मातेची थोरवी, शेकडो गुरुहूनी” || जीवनातील प्रत्येक गोष्टीवर सुंदर असे भाष्य राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून केले आहे. या आधुनिक युगात प्रत्येक व्यक्तीने ग्रामगीता अंगीकारावी तिचा स्वीकार करावा.

शेवटी ग्रामगीतेचे महत्व सांगताना तुकडोजी महाराज म्हणतात,

“ग्रामगीता नव्हे पारायणासि, वाचता वाट दावी जनासि | समूळ बदलावी जीवनासि, मनी घेता अर्थ तिचा “||

अशा प्रकारे राष्ट्रसंतांचे जीवनकार्य संपूर्ण विश्वाला आदर्श आहे. राष्ट्रसंताच्या कार्यास विनम्र अभिवादन करते, ग्रामगीतेस विनम्र अभिवादन करून लेखन थांबविते.

“हर देश मे तू, हर वेष मे तू तेरे नाम अनेक तू एकही है “||

– मनीषा मडावी सौ. पेंदोर

गोंडपिपरी जि. चंद्रपूर, 7888036169

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]