भारतीय मुलतत्ववाद्यांचा नवा प्रयोग
———————————————-
हिंदू गोर बंजा-यांचा कुंभमेळा
———————————————–

 

२०२३ या वर्षीच्या सुरुवातीच्या महिन्यात म्हणजे जानेवारी संपता संपता जळगाव जिल्ह्य़ातील जामनेर तालुक्यातील गोद्री या गावी( हे गाव विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील आहे.) २५ते ३० या तारखांना अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना-नायकडा समाजाचे वतीने कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याच्या बातम्या सर्व चॅनेल्सवर धडाधड उमटल्याही.चांगली प्रसिध्दी देण्यात आली.
*या कुंभमेळ्यास दोन विशिष्ट पक्षाच्या नेत्यांची गर्दी झाल्याचे स्मरते.
○आजकाल कोणीही असे मेळावे भरवितात.यापैकी बरेच मेळावे प्रायोजित असतात.अशा प्रायोजित मेळाव्यातून काहीना उपकृत करून ठेवले की मताचे पीक सहज घेता येते.अशा प्रकारांना बळी पडणारे अलिकडे खूप आहे.अशा उपटसुंभाना पुढे “नेता ” म्हणून मिरवता येते.व चारपैसे गाठीला बांधता येतात.
तर असो.
○मी यवतमाळ जिल्ह्य़ातील.त्यामुळे बंजारा समुहातील बरीच मंडळी ओळखीची.थोडेफार ऐकून, थोडेफार वाचून या बंजारा समुहाची सांस्कृतिक ओळख आहे.
○ पण इतक्या वर्षात पोहरागड चे यात्रे शिवाय दुसरा उत्सव बंजा-यांचा महाराष्ट्रात, विदर्भात असल्याचे कधी ऐकण्यात, पाहण्यात आले नाही.
○अचानक जाने २०२३ मध्ये जामनेर तालुक्यातील गोद्री येथे कुंभमेळा भरत असल्याचे दृश्य चॅनेल्स वर दिसू लागले.याचे नेमके कारण काय असेल?
○कोणा ओळखीच्या बंजारा बांधवाला विचारावे असे मनात होते.पण ते राहून गेले
○ अलिकडेच एका कार्यक्रमात बाहेर पुस्तकाचा स्टाॅल होता.त्यामधील एका पुस्तकाच्या शिर्षकाने लक्ष वेधून घेतले.लेखक परिचित आहे.उत्सुकता म्हणून लेखकाचे या पुस्तकासह अन्य दोन पुस्तकही विकत घेतली .

हिंदू गोर बंजा-यांचा कुंभमेळा आणि बंजारा धाटीसंस्कृती:
ही पुस्तिका केवळ ३८ पानाची असल्याने उत्सुकता म्हणून वाचून काढली. आणि क्षणभर मेंदूला झिणझिण्या आल्या. अस्वस्थ झालो.ज्या समुहाने आपली वेगळी सांस्कृतिक ओळख या महाराष्ट्रात निर्माण केली. आज शैक्षणिक क्षेत्रातही ब-यापैकी नावारूपास आली.तरी बहुसंख्य लोक अद्यापही तांड्यावरच राहतात.याच बंजारा समुहातील स्मृतिशेष वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे अकरा वर्षे नेतृत्व केले.त्यांचा आदर्श या समाजाच्या पुढील पिढयांनी ठेवून वाटचाल केली-प्रगती केली.हा समुह आदिवासी प्रमाणे वर्णव्यस्थेच्या बाहेरचा.
जसे फार वर्षापूर्वी येथील आरएसएस कडून आदिवासींवर प्रयोग करण्याचे षडयंत्र रचण्यात येवून त्यांना आज “वनवासी” ठरवण्याचा जोरकस प्रयत्न होतो आहे.आदिवासी मध्ये सेवेच्या नावाखाली प्रवेश करून त्यांना त्यांच्या संस्कृती,त्यांच्या असलेल्या सामाजिक मान्यते पासून विलग करण्याचे कारस्थान सातत्याने गेले ६६ वर्षे सुरू आहे.त्यामुळेच आता आदिवासींची स्वतःची ‘आदिवासी ‘ म्हणून असलेली ओळख लोप पावते की काय हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.म्हणूनच भारतभरातील आदिवासी आपापल्या ठिकाणी या विरूध्द आवाज उठवत आहे.
नेमका असाच प्रयत्न महाराष्ट्रात बंजारा समुहाबाबत होत असल्याने अस्वस्थ झालेले डाॅ. प्रकाश राठोड यांनी ही पुस्तिका आपल्या बंजारा बांधवांना जागृत करण्यासाठी लिहून प्रसिध्द केली.असे मला ठामपणे वाटते नव्हे खात्री आहे.
मूलतत्त्ववादी विचारपंरपरेचे लोक – संघटना सातत्याने भारतीय समाजव्यवस्थेत विद्वेष पसरवण्याचे काम करत आहे.ही मंडळी सांस्कृतिक पातळीवर जशी सक्रिय आहे तशी राजकारणातही आहे.धर्म व राजकारण याची सरमिसळ करण्याचा नव्हे तर धर्माला स्वतःच्या राजकीय अजेंडया साठी वापरण्याचे झालेले / होत असलेले प्रयत्न आपण अनुभवतो आहेच.धर्माला राजकारणात ओढून-त्याचा बेमालूम वापर करून देशातील सामान्य जनतेचा बुद्धिभेद करण्याचे कारस्थान सतत सुरू आहे.सलोख्याचे सर्व प्रदेश उध्वस्त करून धर्माआधारीत -धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेच्या दिशेने हा देश घेवून जाण्याचे प्रयत्न होत आहे.या बाबतही डाॅ. बाबासाहेब म्हणतात, “धर्म हा सत्तेचा स्त्रोत आहे हे भारताच्या इतिहासाने सोदाहरण पटवून दिले आहे ”
ह्या धर्माधिष्ठित राजकारण करणा-या राजकीय पक्षाचा अजेंडा एव्हाना स्पष्ट व उघड झाल्याचे दिसतेच आहे.त्यामुळे देशातील अल्पसंख्यच समाज एका अनाम दहशतीखाली वावरत असल्याचे अनेक मान्यवर विचारवंत/ बुध्दिवाद्यांनी वेळोवेळी मत मांडली आहे.या बुद्धिवाद्यासंदर्भात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या Annihilation of caste या अत्यंत ऐतिहासिक निबंधामध्ये म्हणतात ,” प्रत्येक देशात बुद्धिवादी लोक,सत्ताधारी वर्ग नसला तरी, प्रभावशाली वर्ग असतो, बुद्धिवादी वर्गास दूरदृष्टी असते, तो सल्ला देऊ शकणारा आणि पुढाकार घेणारा वर्ग असतो.कुठल्याही देशात सामान्य जनसमुदाय स्वबुध्दियुक्त विचार आणि कृती असलेले जीवन जगत नाही.तो बहुतांशी अनुकरण करणारा असून बुद्धिवादी वर्गाचे अनुकरण करतो.या देशाचे भवितव्य बुद्धिवादी वर्गावर अवलंबून असते असे सर्वस्वी म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. हा वर्ग प्रामाणिक, स्वतंत्र आणि निर्लोभी असेल तर संकट समयी पुढाकार घेवून तो योग्य दिशा देईल असा भरवसा त्याच्यावर ठेवता येऊ शकतो ” या पार्श्वभूमीवर डाॅ प्रकाश राठोड यांनी ही छोटी पुस्तिका लिहून अशी भुमिका पार पाडली असे ठामपणे म्हणता येईल. म्हणूनच डाॅ. राठोड या पुस्तिकेत म्हणतात:
“कुंभमेळा घेणारे लोक स्वतःला हिंदू गोर बंजारा म्हणवून घेत आहेत.हे हिंदू गोर बंजारा कोणत्या संस्कृतीचे लोक आहेत ?,हे लोक हिंदू गोर बंजारा केव्हा झाले?,या लोकांचा हिंदू धर्माशी संबंध आहे काय ?,या लोकांना हिंदू गोर बंजारा कोणी केले?,का केले?,हे लोक कोणाचे हस्तक आहेत?,का आहेत?,मुळात धर्म न मानणा-या बंजारा समाजाला हिंदू करण्याचे प्रयत्न केव्हापासून होत आहेत?,का होत आहेत? असे प्रश्न कुंभमेळ्याचे आयोजन करणा-या आणि त्यात पुढाकार घेणा-या लोकांना बंजारा समाजाने जरा कठोरपणेच आता विचारले पाहिजे. कुंभमेळा ही बंजारा समाजाची संस्कृती आहे काय ?बंजारा समाजाचा हा धार्मिक विधी आहे काय ?,कुंभमेळा हा बंजारा समाजाचा महत्वाचा धार्मिक विधी असतात,कुंभमेळ्यात बंजारा समाजाच्या मुलभूत प्रश्नांवर चर्चा झाली असते,कुंभमेळा ही बंजारा समाजाची संस्कृती असती किंवा समाजाचे संघटन करण्यासाठी कुंभमेळा हे प्रभावी माध्यम असते तर संत सेवालाल महाराजांना आणि संत रामराव महाराजानांही कुंभमेळाचे आयोजन करावेसे वाटले असते.बंजारा समाजात असे धार्मिक मेळे यापूर्वी का झाले नाही?,हजारो वर्षे बंजारा समाजाला जे सुचले नाही ते या मंडळींना कसे सुचत आहेत? असे प्रश्न स्वाभाविकपणेच या निमित्ताने पुढे येतात. त्यामुळे या कुंभमेळ्याची बंजारा धाटीसंस्कृतीच्या वैज्ञानिक निकषावर चिकित्सा करणे आज आवश्यक झाले आहे.” असे अनेक मुलभूत प्रश्न उपस्थित करत डाॅ. प्रकाश राठोड यांनी या कुंभमेळ्याची चिरफाड केली आहे.
या छोट्या पुस्तिकेत त्यांनी ऐतिहासिक तथ्याची मांडणी करत नेमका बंजारा समाज कसा आहे याचे खरे चित्र स्पष्ट पणे मांडले.गोद्री गावातील कुंभमेळा म्हणजे फॅसिस्ट प्रवृत्ती असल्याचेही नमूद केले आहे.ते म्हणतात, “गोद्री गावात होत असलेल्या कुंभमेळ्याचे अत्यंत दूरगामी परिणाम तांडासंस्कृतीवर होणार आहेत. हे गंभीर परिणाम केवळ जळगाव जिल्ह्य़ावर होणार आहेत असे नव्हे, तर संबंध तांडासंस्कृतीलाच हा कुंभमेळा घातक ठरणार आहे.धर्मविहीन जीवन जगणा-या सबंध मानवी लोकसमूहांसाठीच हा धर्मांध कुंभमेळा अडचणीचा ठरणार आहे.” असा गंभीर इशाराही देवून ठेवला आहे.
पुढे ते अत्यंत गंभीर विधान करताना म्हणतात, “इतकेच नव्हे तर या देशातील सर्वच साधनवंचित लोकसमूहांना वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांना हिंदुत्वाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहे”
ज्या गोद्री गावात हिंदू गोर बंजारा कुंभमेळा जाहिर झाला. तेव्हा या तथाकथित कुंभमेळ्या विरूध्द जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय तांडा सुधार समिती ने डाॅ. प्रकाश यांचे नेतृत्वात सतत तीन चार महिने जनजागरण केल्याचेही कळते.
हे आव्हान किती भयंकर-भयावह आहे यांचे सुचनच संपूर्ण पुस्तिकेत डाॅ. प्रकाश राठोड करतात.म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर एनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये म्हणतात, ” तुम्हाला त्या व्यवस्थेला खिंडार पाडण्याची इच्छा असेल तर विवेकाला नकार देणा-या वेद आणि धर्मशास्त्रांना सुरुंग लावलाच पाहिजे.”
असे सुरुंग लावण्याचे काम डाॅ .प्रकाश राठोड यांच्या ” हिदू गोर बंजा-यांचा कुंभमेळा आणि बंजारा धाटीसंस्कृती” या छोट्या पुस्तिकेने केले आहे.असे निश्चित म्हणता येते. एक महत्वाचा विषय अत्यंत अभ्यासपूर्ण व संयतपणे मांडल्या बद्दल डाॅ. प्रकाश राठोड यांचे अभिनंदन.
सर्वांनीच आवर्जून वाचावे अशी ही पुस्तिका असल्याने आपले लक्ष या कडे वेधतो.

हिंदू गोर बंजा-यांचा कुंभमेळा आणि बंजारा धाटीसंस्कृती
लेखक:डाॅ.प्रकाश राठोड
प्रकाशक:अखिल भारतीय तांडा सुधार समिती
किंमत:₹४० फक्त

प्रभू राजगडकर
नागपूर
दि २८ मार्च २०२३