मध्य प्रदेशातील मराठी प्रांत

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातल्या सौंसर शहरात शिवरायांचा अर्धपुतळा
ब्रिटिश भारत सोडून गेल्यावर देश स्वतंत्र झाला. राज्य कारभारासाठी प्रांत रचना होऊ लागली. ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतांत केली होती. परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. भाषावार प्रांतरचना व्हावी, यासाठी  स्वातंत्र्य पूर्वीपासूनच चळवळ सुरु होती. बिहार राज्याची फाळणी करून ओरिसा हे भाषावार प्रांतरचना झालेले पहिले स्वातंत्र्यपूर्व राज्य होय. “एक भाषा; एक राज्य” हे राज्य कारभाराच्या दृष्टीने सोयीचे ठरते. त्यातून शिक्षण, संवाद आणि विकास अधिक समृद्ध होतो.
स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी भाषिक लोक मुंबई राज्य, हैदराबाद संस्थान आणि मध्य प्रांतात विभागलेले होते. विदर्भाचे आठ जिल्हे मध्य प्रांताचा भाग होते. या सर्व भागांना एकत्र आणून भाषेच्या आधारे एक राज्य बनवण्यात यावं, असा विचार त्या काळात बळावत होता. १९६०च्या काळात मराठी भाषिकांचे संयुक्त राज्य असावे, असे मत पुढे आले. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. महाराष्ट्र राज्यात मराठी भाषिक कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेशचा भाग संयुक्त महाराष्ट्रात आला. तेव्हा मध्य प्रांतातील पांढुर्णा, सौंसर, बैतुल हे मराठी भाषिक भागदेखील समाविष्ट होणे अभिप्रेत होते. पण, तसे झाले नाही.
मराठीभाषिक मध्य प्रांत
छिंदवाडा, बैतुल जिल्ह्यात मराठी भाषिक बहुसंख्य आहेत. हा भाग जरी हिंदी भाषिक प्रांतात असला तरी इथली माणसं आजही मातृभाषा मराठीची जपणूक करीत आहेत. भाषावार राज्यनिर्मिती पूर्वी मध्य प्रदेशात १९५३ पासून सुमारे तीन वर्षाहून अधिक काळ मराठी ही राजभाषा म्हणून प्रचलित होती. मध्य प्रदेश राज्याने हिंदी व मराठी या प्रादेशिक भाषांना ’राजभाषा’ म्हणून घोषित केले होते. तसेच स्वतंत्र भाषा विभाग स्थापन केला. हिंदी व मराठी भाषा तज्ञांची एक समिती नेमली व राज्यकारभाराच्या परिभाषेचा अधिकृत ’प्रशासन शब्दकोश’ निर्माण केला होता. अनेक वर्ष शालेय अभ्यासक्रमात मराठी हा विषय होता. मात्र, काही वर्षांपासून मराठी अभ्यासक्रम बंद करून त्याऐवजी संस्कृत हा विषय देण्यात आला. मराठी भाषिक प्रांतात आणि मायबोली मराठी असलेल्या या विद्यार्थांचा मराठी शिकण्याचा हक्क इथल्या सरकारने हिरावून घेतलाय. पण, इथली कुटूंब आवडीनं दूरचित्रवाहिन्यांवरील मराठी मालिका बघतात. मराठी बोलतात. महाराष्ट्रातील सारे सणवार साजरे करतात, हे विशेष.
छत्रपती शिवाजी महाराज श्रद्धास्थान
जन्माला आलेल्या बाळाच्या संगोपनात त्याला मराठीचे बोल ऐकिविले जाते. इथला माणसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मॉं साहेब जिजाऊ यांच्याबद्दल मोठी श्रद्धा आहे. याच आस्थेपोटी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातल्या सौंसर शहरात शिवरायांचा अर्धपुतळा उभारण्यात आला. पुढे प्रचंड वादही झाला. सौंसर शहरातल्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी होती. त्यासाठी शहरातील युवा संघटनेनं शिवाजी महाराजांचा पुतळा तयार केला. चौकात मध्यभागी एक दगडी चौथरा उभारून त्यावर शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली. महाराजांचा अर्धपुतळा त्या ठिकाणी होता. या चौथऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा येऊ शकतो, असं कारण देत नगरपालिकेनं या पुतळ्याला परवानगी नाकारली आणि फेब्रुवारी २०२० रोजी बुल्डोझर मागवून रात्रीच चौथरा उद्ध्वस्त करण्याची कारवाई करण्यात आली. लोकांना हे लक्षात येताच ते रस्त्यावर उतरले. छिंदवाडा -नागपूर महामार्गावर त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. तेव्हा मध्य प्रदेशात काँग्रेसनेते कमलनाथ हे मुख्यमंत्री होते. काँग्रेसच्या राज्यात शिवरायांचा अवमान होत आहे, असं म्हणत भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी पुतळ्याच्या चौथऱ्यावर बुल्डोजर चालवतानाचा व्हिडीओ शेअर केला. तेव्हा त्याची चर्चा महाराष्टात देखील झाली होती.
सौंसरमध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणार
सप्टेंबर महिन्यात छिंदवाडा जिल्ह्यातील महत्वाच्या नगरपालिका निवडणूक पार पडल्या. यावेळी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा विषय चर्चेला. एका सभेत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सौंसर येथील छिंदवाडा -नागपूर महामार्गावरील चौकात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा केली. “छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्र का गौरव हैं, हमारे आराध्य हैं व देश की प्रेरणा के स्रोत हैं।” असे शिवराजसिंग म्हणाले. आतातर सौंसरमध्ये १५ पैकी १४ जागा भाजपने जिकून एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. त्यामुळे हा पुतळा होणार, हे नक्की. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची ओळख या भागात “मामा” नावाने देखील आहे. मुख्यमंत्री कन्यादान योजना, लक्ष्मी योजना, मुलींना आरक्षण द्यायला सुरुवात केली, त्यानंतर राज्यातील मुली त्यांना मामा म्हणू लागल्या. आता राज्यातील वडीलधारी मंडळीही त्यांना मामा म्हणू लागली आहेत.
बससेवेतून ऋणानुबंध
कोणत्याही राज्याच्या प्रगतीसाठी दळणवळणाच्या सोयी असणे अपेक्षित आहेत. त्याशिवाय त्या भागात विकास पोहोचत नाहीत. मात्र, मध्य प्रदेशात महाराष्ट्र राज्याप्रमाणे परिवहन महामंडळाच्या बसेस नाहीत. मध्यप्रदेश परिवहन मंडळाने येथे खासगी बसगाड्याना परवानगी दिली आहे. छिंदवाडा, भोपाल, इंदोर, बैतुल, पांढुर्णा, मंडला, सागर, देवास, शिवनी, इत्यादी शहरांसाठी नागपुरातून दररोज अनेक खासगी बसेस जातात. विदर्भातून व विशेषतः नागपुरातून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी मध्यप्रदेशात जात असतात. याशिवाय तिथून देखील मोठ्या संख्येने प्रवासी येतात. सीमेशी असलेल्या जिल्ह्यांत मध्य प्रदेश व महाराष्ट्र सोयरिकीचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. इतकेच नव्हेतर या भागातील अनेकजण खरेदीसाठी नागपुरात येतात.
प्राचीन काळापासून जलनाते आजही टिकून आहे
सरितेचे जलनाते
आदिवासीबहुल बैतूल जिल्हा सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसले आहे. याच जिल्ह्यातील मुलताई तहसीलच्या ईशान्येकडून वर्धा नदी उगम पावते आणि ३५ किमी अंतर पार करून विदर्भात प्रवेश करते, जी पुढे चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीला मिळते. वैनगंगा नदी ही मध्य प्रदेशातील मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दरकेसा टेकड्यांतून उगम पावते. तिथून ती बालाघाट जिल्ह्यातला सुमारे ९८ किलोमीटरचा प्रवास करून विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात प्रवेश करते. विदर्भात ती भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधून वाहते. छिंदवाडा जिल्ह्यातील दमुआ जुन्नारदेव येथील सातपुडा पर्वतरांगांच्या पर्वतांमधून कन्हान नदी उगम पावते. छिंदवाडा जिल्ह्याच्या पश्चिम भागातून वाहत देवगडच्या प्रसिद्ध किल्ल्याजवळून वाहत सौंसर तालुक्यात प्रवेश करते, तेथून ही नदी नागपूरच्या उत्तरेकडील प्रदेशात प्रवेश करते आणि नंतर भंडारा जिल्ह्यात पोहोचते. भंडारा शहरापासून सुमारे 10 किमी अंतरावर ती वैनगंगा नदीला मिळते. या दोन्ही प्रदेशांचे प्राचीन काळापासून जलनाते आजही टिकून आहे.
मराठी भाषिकांचे तीर्थक्षेत्र
मध्य प्रदेश राज्यातील हुशंगाबाद जिल्ह्यातील एक पर्वतावरील थंड हवेचे ठिकाण म्हणजे पंचमढी. या ठिकाणाहून गुप्त महादेव, छोटा महादेव, नागद्वार या स्थळांस जाता येते. हे ठिकाण सातपुडा पर्वतश्रेणीतील असून पूर्वी इंग्रजांची येथे छावणी होती. विदर्भातील अनेक भक्त येथे दर्शनासाठी जातात. सातपुडा पर्वताच्या कुशीत अत्यंत दुर्गम भागात वसलेले नागद्वार हे तीर्थक्षेत्र अती कठीण व देवदुर्लभ आहे, असे सांगितले जाते. पचमढी मध्यप्रदेशात असले तरी नागद्वार, चौरागढ यात्रा करणारे मुख्यत्वे महाराष्ट्रीय आणि विदर्भातील मराठी भाषिक यात्रिकच असतात. नि:शुल्क भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था करणार्‍या बहुतांश संस्था वैदर्भियच आहेत. जाम नदी आणि सरपा नदीच्या संगमावर नागपूर-छिंदवाडा रोडवर जामसावली येथे राम भक्त हनुमानजीची निवांत अवस्थेत बसलेली मूर्ती आहे. हे मंदिर सुमारे 100 वर्षे जुने आहे. मंदिराची खास गोष्ट म्हणजे येथे स्थापित हनुमानजींच्या मूर्तीच्या नाभीतून पाणी येते. भक्त प्रसाद म्हणून घेतात. अनेक भाविक हे पाणी आपल्या घरी घेऊन जातात. मराठी भाषिक गावात पंढरीच्या विठूरायाची देखील आराधना होते.
पांढुर्णा, सौंसर, बैतुल या भागातील तरुणाच्या मनात आजही विदर्भाविषयी प्रेम आहे. विदर्भ स्वतंत्र राज्य असता तर मध्यप्रदेशात जाण्याचा प्रश्नच आला नसता, असे मराठी भाषिक तरुण बोलून दाखवितात. पूर्वी मध्य प्रदेशात मराठी भाषिक आमदारांची संख्या मोठी होती. आता ती देखील रोडावत आहे. विदर्भात हा प्रांत राहिला असता तर  चित्र काही वेगळे राहिले असते, असे इथल्या तरुणांना वाटते.
– देवनाथ गंडाटे
7264982465