श्रमिक एल्गार आणि गांधी विचार

‘बापू तेरे देश में, दारू खुली बजार में’, ‘गांधी तेरे राज में, दारू खुली बजार में’ अशा घोषणा देत, मूल शहरात 2 आॅक्टोबर 2001 ला मूल पोलिस स्टेशनवर दारूबंदीच्या मागणीसाठी श्रमिक एल्गारचा मोर्चा धडकला. मोर्चातील हजारोंची गर्दी पाहून मूल वासीयांच्या तोंडात आश्चर्याने बोटे टाकली होती. हातात गांधीच्या शेकडो तसबीरी, दोन—दोनच्या शिस्तबध्द परंतू न संपणार्या रांगानी, त्या दिवशीचा मूल शहरातील गांधी जयंतीचा उत्सव श्रमिक एल्गारने कृतीयुक्त साजरा केला होता. पुढे जावून याच मुद्याने जिल्हयात दारूबंदी आंदोलनाचे वावटळ उठले होते, कदाचित तो महात्मा गांधीचाच आशिर्वाद असावा.

सत्याग्रह आणि शांततेचा मुलमंत्र देणारे गांधींचा संघटनात्मक दृष्टीकोण श्रमिक एल्गारने स्विकारला. लोकांची प्रश्न, महिला, दलित, आदिवासी आणि मजूरांना न्याय देण्यासाठी गांधीजींचा सत्याग्रह आणि संघटना बांधणीचा दृष्टीकोन श्रमिक एल्गारने स्विकारला होता. गांधीजींची अंत्योदय संकल्पनेवरूनच समाजातील तळातील बहुजनांच्या प्रश्नाकडे श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी संघटनेची रचना केली होती. या रचनेतूनच काल समाजातील तळाशी असलेले अनेक तरूण, महिला आणि व्यवस्थेच्या प्रवाहात समोर येवून चांगले नेतृत्व देत आहे.
संघटनेच्या सुरूवातीला म्हणजेच जवळपास तेविस वर्षापूर्वी मूलच्या गांधी पुतळ्याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष नव्हते, चौकाचे शेजारी घाण पसरून असायची. अगदी गांधी जयंती, पुण्यतिथीलाही महात्मा गांधीच्या पुतळ्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. ही बाब अॅड. पारोमिता गोस्वामी यांना खटकली, श्रमिक एल्गारचे कार्यकर्त्याना घेवून, दरवर्षी गांधी पुतळ्याची स्वच्छता, माल्यार्पण करून, आदरांजली देण्याचा श्रमिक एल्गारचा पुढे बरेच वर्ष नित्याचा कार्यक्रम झाला होता. श्रमिक एल्गारने अनेक आंदोलने, मोर्चे यशस्वी करण्यासाठी गांधी जयंतीचाच मुहूर्त निवडला होता. आंदोलनही गांधीच्याच मार्गाने, गांधीवरच श्रध्दा ठेवून केले होते. श्रमिक एल्गारने चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी जाहीर करण्यासाठी नागपूर अधिवेशनातील विधीमंडळावर 12 डिसेंबर 2012 रोजी भव्य मोर्चा काढला होता. यावेळी तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका महिण्यात चंद्रपूर जिल्हा दारूबंदीवर निर्णय घेण्याचे जाहीर केले होते. मात्र निर्णय न घेतल्यांने, श्रमिक एल्गारनी चंद्रपूर शहरातील गांधी पुतळ्याजवळ दिवसभर चरख्यावर सुत कातत ‘सत्याग्रहाची शपथ’ आंदोलन केले होते.

समाजात समता निर्माण झाली पाहिजे, यासाठी शांततेने परंतू सत्याग्रहाचा मार्गच स्विकारला गेला पाहिजे यासाठी श्रमिक एल्गार आणि पारोमिता गोस्वामी यांचा आग्रह असायचा. यामुळेच, श्रमिक एल्गारने पोलिसांनी मारलेल्या चिन्ना मट्टामीच्या हत्येच्या विरोधात, पोलिस हिंसेच्या विरोधात चिन्नाची आई जब्बेबाई हिला शांततेच्या मार्गाने, कायद्याच्या मार्गाने न्याय मिळवून दिला, त्याचप्रमाणे नक्षल्यांच्या हिंसेचाही विरोध केला. नक्षली हिसेंत बळी गेलेल्यांना भरपायीसाठी 2 नागपूुर कमीश्नर कार्यालयावर आंदोलन करीत धोडराजच्या बिच्चेबाईसह चार नक्षल पिडीतांना न्याय मिळवून दिला होता.
जिवती तालुक्यात शेकडो गरीब कोलाम, गोंड आदिवासींच्या जमिनी कायदेशीर मार्गानी परत मिळवून देण्याच्या आंदोलनात पारोमिता गोस्वामीसह अनेक कार्यकर्त्यावर एका आठवड्यात पाच ​जीवघेणे हल्ले झाले. प्रचंड मारहाण झाली, रक्तपात झाला, गैरआदिवर 18 एफआयआर दाखल झाल्यात, मात्र या लढ्यातही श्रमिक एल्गारनी गांधीजींचा शांतता आणि सत्याग्रह कायम ठेवला. ‘​हमला चाहे जैसा होगा, हात हमारा नही उठेगा’ हा श्र​मिक एल्गारचा नारा होता. यामुळेच या संपूर्ण लढ्यात श्रमिक एल्गारच्या विरोधात कुणालाही तक्रार करण्याची संधी मिळाली नाही. एकावरही मारहाण किंवा कोणतेही गुन्हे दाखल झाले नाही. श्रमिक एल्गारच्या कार्यकर्त्यात ही सहनशक्ती निश्चितच गांधीजीच्या विचारातून मिळाली.

जिवती तालुक्यातील शेकडो आदिवासींना जमिन मिळाल्यानंतर, ज्या गावातून जमिनी परत मिळविण्याचे आंदोलन सुरू केले, त्याच आंबेझरी रोड गुड्यावर या आंदोलनाची आठवण म्हणून काय करता येईल याचा विचार सुरू असतांनाच, झाडू कोडापे यांनी, ‘ताईने भाषणात नेहमी सांगत होते, आपल्याला जमिन गांधीजीच्या मार्गानेच मिळेल, त्याच्या विचारानेच आपल्याला न्याय मिळेल, आता आपल्याला जमिनी परत मिळाल्या आहेत, गांधीजीच्या मार्गानीच मिळाल्या आहेत, तर गावात आपण गांधीजीचाच पुतळा मांडू या’ झाडू कोडापेच्या विचाराला सर्वानी साथ दिली आणि 2 आॅक्टोबर 2007 रोजी आंबेझरी रोड गुडा या कोलाम वस्तीत, जिवती तालुक्यातील पहिला गांधीजीचा पुतळ्याचे अनावरण श्रमिक एल्गारच्या पुढाकारातून करण्यात आले.

श्रमिक एल्गारच्या कार्यकर्याना गांधी समजला पाहिजे, त्यांचे विचार समजले पाहीजे यासाठी अनेकदा कार्यकर्त्याची प्रशिक्षण शिबीरे, बैठक सेवाग्राम येथील गांधी आश्रमात घेतल्या गेले, यामुळेच आजही संघटनेचे शेकडो कार्यकर्ते आक्रमक आ​हेत, मात्र हिसंक नाही, आपल्या मुद्यावर ठाम राहून सत्याग्रह करतात.
गांधी विचार समाजात वाढला पाहिजे, गांधीवाद सर्वानी समजून घेतला पाहिजे यासाठी श्रमिक एल्गारने बाल संस्कार केंद्रातून गांधी विचाराचे धडे दिले. मुंबईतील जगविख्यात टाटा समाज विज्ञान महाविद्यालयात अनेक वर्ष पारोमिता गोस्वामी यांनी ‘गांधी आणि संघटना’ या विषयावर विचार मांडण्यासाठी मुद्दाम मुंबईला जात असे. श्रमिक एल्गारच्या सुरूवातीच्या काळापासूनच गांधी विचाराची आणि गांधीजींची भावसून कॅथी श्रीधर हिने श्रमिक एल्गारला सर्वोपरी मदत केली, तीच्या सहवासानेही श्रमिक एल्गारची गांधी विचाराची वीण घट्ट झाली असावी.

आज गांधी जयंती, गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रमिक एल्गारच्या कार्याचा मागोवा घेतांना, या कार्यामागील प्रेरणांचा विचार केल्यास, महात्मा गांधीचा विचार किती मोठे कार्य करू शकते याचा प्रत्यय येते.