जुलै 2022 ला भारतातील बहुतांश हवामान विभागाने पावसाचे नवीन विक्रम तयार केले आहेत. भारतीय मौसम विभाग ने आधीच यावर्षी 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल तो साधारणतः 103 टक्के राहील असे वर्तविले होते. उत्तरेकडील बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, तसेच पश्‍चिम बंगाल या राज्यांना सोडले तर संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. जून आणि जुलै महिन्यातील पावसाने संपूर्ण भारतात पुराचे थैमान आणले आहे. राजस्थान मध्ये तब्बल 58 टक्के जास्त पाऊस पडलेला आहे, महाराष्ट्रात 35 टक्के, मध्य प्रदेशात 22 टक्के, तामिळनाडूमध्ये 77%, गुजरात मध्ये 60 टक्के, तेलंगणात सर्वात जास्त 107 टक्के पाऊस पडला आहे. या सर्व नैसर्गिक गोष्टी आहेत असे आपण वर म्हणत असलो तरी एकूणच हवामानाचे आरोग्य मनुष्याने बिघडवले आहे. 

 गरज नसताना प्रचंड पाऊस पडतो,  कमी  कालावधीत जास्त पाऊस पडतो त्यामुळे तो वाहून जातो आणि जमिनीच्या  सर्वात वरच्या थरातील  सुपीक माती  वाहून नेत असतो, नद्यांनी वाहून आणलेल्या या माती  मुळे धरणांचे आयुष्य सुद्धा कमी झालेले आहे, भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या धरणाची म्हणजेच भाकरा नांगल ची  साठवणूक क्षमता 25 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे.  धरणातील पाणी साठवण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम झाल्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागते. धरणातून पाणी सोडताना ते अत्यंत व वैज्ञानिक पद्धतीने आणि अविवेकी पद्धतीने सोडले जाते, त्यामुळे ही खालच्या परिसरातील अनेक लोकांचे जीवन आणि शेती धोक्यामध्ये आलेले आहेत.  2011 ते 2020  या  काळातील आकडेवारीच्या आधारावर  असे म्हणता येते की, दरवर्षी भारतात सरासरी 1500  व्यक्ती पुरामुळे आपला जीव गमावतात. मोठमोठी धरणे बांधून सुद्धा बिहार आणि बंगाल या दोन राज्यात दरवर्षी भारतातील सर्वात जास्त लोक पुरामुळे मृत्युमुखी पडत असतात. आजकाल बरीच धरणे ही बहुउद्देशीय असतात.  सिंचनाशिवाय उद्योगांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी लागतोय आणि त्यामुळे धरणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते,  धरण भरेल की नाही ? उद्योगांना पाणी मिळणार की नाही ? असे प्रश्न उद्योजकांच्या मनात असतात आणि त्यामुळे धरणात पुरेपूर पाणी साठवण्याचा प्रयत्न केला जातो. बरीच धरणे तर उद्योगांनाच बांधलेली असतात,  बरेच वेळा असे होते की उद्योगांना पाणी पुरले पाहिजे या नादात सुरुवातीला धरणांतून पाणी सोडले जात नाही.  कधी कधी अशी स्थिती येते की, धरणातून जितक्या वेगाने पाणी सोडले जाते त्यापेक्षा जास्त वेगाने पाणी पाणलोट क्षेत्रातून घरणा मध्ये जमा होत असते. आणि मग शेवटी खालच्या गावांचा विचार न करता धरणाला वाचवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात धरणांतून पाणी सोडावे लागते, ही मनुष्याची अविवेकी पद्धती आहे,  आणि यामुळे येणारा पूर हा कृत्रिम पूर म्हणावा लागेल. मुळातच एखाद्या धर्माची निर्मिती ही पूर  नियंत्रणासाठी केली जाते. पूरनियंत्रण,  सिंचन,  जमिनीचे क्षरण थांबवणे,  पर्यटन,  मासेमारी, कारखानदारी, वीज निर्मिती  असे महत्त्वाचे उद्दिष्ट समोर ठेवून धरणांची निर्मिती केली जाते.  या अनेक काही उद्दिष्टांना बाजूला ठेवून आज-काल कारखानदारी, वीज निर्मिती याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले जाते आहे.

2017 ला राज्यसभेत सरकारच्यावतीने एक आकडेवारी देण्यात आली या आकडेवारीत असे म्हटले आहे की 1953 पासून तर 2017 पर्यंत देशात 1,07,487 लोकांनी  पूर परिस्थितीमुळे आपला जीव गमावलेला आहे आणि 3,65,860  कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झालेले आहे. जगातील एक पंचमांश लोकं पुरामुळे भारतात मरण पावले आहेत. मोठमोठे पूर हे आधी वीस ते पंचवीस वर्षांनंतर एखाद्यावेळेस यायचे आता दर दोन-तीन वर्षांनी मोठे पूर येऊन प्रचंड मोठा नुकसान करीत आहेत,  पावसाचे दिवस कमी झालेले आहे.  एखाद्या भागात सरासरीएवढा पाऊस पडत असला तरी तो कमी दिवसांत पडतो. हवामान सुद्धा बदलत चाललेले आहे,  राजस्थान हा वाळवंट असलेला राज्य असला तरी दरवर्षी राजस्थान आता पूर परिस्थितीमुळे आपली नवीन ओळख बनवत आहे. अशाच प्रकारची स्थिती देशाच्या इतरही भागात पाहावयास मिळते,  हवामान शास्त्रीय दृष्ट्या  अनेक हवामानाचे विभाग आपली ओळख बदलत आहेत.  शहरे ‘हिट आयलँड’  बनवलेली आहेत,  त्यामुळे शहरात चारही बाजूच्या  खेळ्यांपेक्षा तब्बल पाच ते सहा अंश सेल्सिअस जास्त तापमान पहावयास मिळते. परिणामतः शहरात जास्त तापमानामुळे कमी दाबाचा परिसर निर्माण होतो,  या कमी दाबाकडे जास्त दाबाकडून हवा आकर्षित होते आणि शहरांत जास्त पाऊस पडतो.  ज्या खेडूत भागाकडे  आणि शेतीकडे पावसाची गरज आहे तिकडे पाऊस न होता शहरांकडे तो पडताना दिसून येतो आहे.  आणि यामुळे आधीच्याच बंद झालेल्या शहरांतील नाल्या शहरातील लहानशा  ओढ्याचे पण पाणी नदीकडे वाहून नेऊ शकत नाही,  परिणामत:  शहरांच्या खोलगट भागाकडे दरवर्षी पुरांची समस्या निर्माण होते, शहरांची व नियोजित वाढ पूर परिस्थितीला आणखीनच बिकट करत आहे.

 

 

एखाद्या भागातील खाणकाम  पूर परिस्थिती निर्माण करतो याचे उत्कृष्ट उदाहरण चंद्रपूर नागपूर चा परिसर होय.  या  भागात  वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या कोळसा खाणी आहेत.  भारतातील कोळसा मोठ्या प्रमाणात कुठल्या ना कुठल्या नद्यांच्या खोऱ्यात किंवा प्रत्यक्ष दरी परिसरात उपलब्ध आहे. कोळसा कंपन्यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नदीच्या काठाजवळ पुढचे खोदकाम केले आहे.  कधीतरी कोळशाच्या खाणी तर नद्यांना डायव्हर्ट करून   प्रत्यक्ष त्यांच्या पात्रात खोदकाम करीत आहेत.  काही ठिकाणी  ग त्यांच्या दोन्ही किनार्‍याजवळ प्रचंड मोठे  ओव्हर बर्डन्स  निर्माण केले गेले आहेत.  पुराच्या वेळी नदीचे पाणी नदीच्या बाहेर पात्रातून वाहत असते,  ते पात्रच   कोळसा कंपन्यांनी गिळंकृत केल्यामुळे ओव्हर बर्डन्स ला  पुराचे पाणी अडवले जाते,  असे पाणी ‘बॅक वॉटर’ तयार करते आणि त्यामुळे चंद्रपूर परिसरात  पूर परिस्थिती निर्माण होते,  याचा अनेक वेळा अनुभव आलेला आहे.  काही ठिकाणी ओव्हर बर्डन्स  नदीच्या काठावर अत्यंत उंच असतात,  जमिनीच्या आणि मातीच्या स्तराचा विचार न करता त्यांची उंची वाढवली जाते त्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे ते खाली येतात आणि कधीकधी प्रत्यक्ष नदीच्या पात्रात ते कोसळतात,  याचाही अनुभव चंद्रपूर परिसरात अनेक वेळा पाहावयास मिळाला.  2006  चा चंद्रपूरचा पूर  अशाप्रकारच्या खान कामाशी निगडित होता, चंद्रपूर शहराच्या दक्षिणेला पठाणपुरा गेट च्या नंतर इरई आणि झरपट अशा दोन्ही नद्या एकत्र येऊन मिळतात,  या नद्यांच्या  संगमा नंतर  इरई  नदीच्या दोन्ही तीरावर   वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे ओव्हर बर्डन्स डंप केले गेले होते,  यामुळे एखाद्या बॉटल नेक सारखी स्थिती  नदीची झालेली होती,  परिणामतः पुराचे पाणी पुढे जाऊ शकले नाही आणि शहरात बॅकवॉटर चे पाणी पसरले.  वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड कंपनीने कोळसा  खोदताना माना गावाच्या जवळ अगदी नदीपासून दहा पुढच्या अंतरापर्यंत खोदकाम केले त्यामुळे इरई नदीच कोळसा  कंपनीच्या खोल खड्ड्यात गेली आणि कंपनीला आपले उत्पादनच बंद करावे लागले.  अशा प्रकारची स्थिति  जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. ओव्हर बर्डन्स ची माती नदीमध्ये येऊन मिसळत असल्यामुळे नद्यांचे पात्र उथळ झाले आहेत आणि त्यामुळे नद्यांच्या पात्राच्या बाहेर पुराचे पाणी जाऊन दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. ओव्हर बर्डन्स वर योग्य वृक्षारोपण केले तर मातीचे क्षरण कमी होऊ शकले असते, परंतु अनेक ओव्हर बर्डन्स  उघडे पडलेले आहेत. कोळशाची प्रचंड हाव पर्यावरणाचे निकष बाजूला ठेवून खोदकाम करायला लावते त्यामुळे एकीकडे कोळसा क्षेत्रांची जिओमोर्फोलॉजी  पूर्णतः बदलली गेली आहे,  तर दुसरीकडे प्रचंड मोठ्या पाण्याचे उपशामुळे अनेक गावांतील भूमिगत पिण्याचे पाणी संपुष्टात आले आहे.

यावर्षी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या भागात गडचिरोली जिल्ह्यातील मेदिगट्टा गॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे बॅक वॉटर ची परिस्थिती सिरोंचा परिसरात निर्माण झाली आणि त्यामुळे  सिरोंचा तालुक्यातील अनेक गाव पुरामुळे प्रभावित झाली आहेत.  मेडीगट्टा हा एक बेरीज आहे,  बॅरेज मधील पाणी नदीच्या पात्राच्या बाहेर जायलाच नको  पाहिजे, परंतु एखाद्या धरणा सारखा मोठ्या प्रमाणात पाणी या बॅरेज मध्ये जमा केल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावावर पुराचे संकट आले आहे.

– डॉ योगेश दूधपचारे

 चंद्रपूर