विदर्भ पूरपरिस्थिती

जन -आयोग २०२२-२३

मी नदी गावचा.वणी या शहराच्या जवळून निर्गुडा नदी वाहते.नवरगाव जंगलातून उगम पावून ती वणी,मंदर,चारगाव, शिरपूर ,पुनवट अशी जवळपास ७० कि.मी.वाहत जावून चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वड -जुगाद या गावाजवळ वर्धा नदीला मिळते. ही निर्गुडा बारमाही नदी होती.उन्हाळ्यात- हिवाळ्यात या नदीवर कपडे धुणे -मस्त पोहणे होत असे.हीच नदी संपूर्ण वणी नगरीला पाणी पुरवठा करीत असे.वणीत पाणी पुरवठा योजना सुरु झाली आणि एक एक करून पिण्याच्या पाण्याच्या विहीरी लोक कचरा ईत्यादी टाकून बुजवत गेले.कितीतरी विहीरी आम्ही बुजत गेल्याचे पाहिले आहे.फार समज नव्हती तरी विहीरीत कचरा टाकतात हे मनाला पटत नव्हते. आज ह्या विहिरी कुठे होत्या असे कोणाला विचारले तर लोक आश्चर्याने पाहतील.
●तर आमच्या निर्गुडा नदीला पावसाळ्यात खुप पूर यायचा. घरापासून नदी जवळच असल्याने पूर पाहणे हा उत्सवच असायचा.या पुराच्या पाण्यात वाहत येणारी लाकड काही पोहण्यात तरबेज लोक बाहेर काढत.कधी कधी गुर वाहत वाहत काठाला लागत.यावेळी नदीचे ते रौद्र रूप पाहून आश्चर्य वाटत असे.पण या पुरामुळे शेतीचे, घरादाराचे, जीवीत हानी ईत्यादी नुकसान होत असे.हे आमच्या गावी नव्हते. कधीतरी कोणी सांगायचा-अमक्या गावात तमका वाहून गेला. पण ते तेवढ्या पुरतच.
●आज निर्गुडा नदीचा नाला झाला आहे.ती बारमाही वाहणारी नदी शहराच्या घाण पाण्याने ‘गटार’झाली.वरच्या भागात नवरगावला धरण झाले अन या नदीचे बारमाही वाहणे बंद झाले. शहरातील प्रशासनानेही नदी स्वच्छ राहील याची कधी काळजी घेतली नाही.लोक ही तेवढेच उदासीन. सर्वप्रकारचा कचरा टाकायला ते सदैव तत्पर. पुढे ही नदी थोडीफार स्वच्छ राहीली. पण आता पात्रात बारामहिने पाणी नसत.
● नदीच्या पुरामुळे काय नुकसान होत याचा पहिला अनुभव अहेरी येथे १९८९ मध्ये आला.सततधार पावसामुळे प्राणहीता नदी तुडूंब भरून वाहत होती. नदी काठची अनेक गावे पाण्याखाली आलीत. शेती बुडाली. अहेरी तर चारी बाजूनी वेढले होते.प्राणहीता तुडूंब त्यामुळे तिला मिळणारे नद्या-नाले बॅकवाॅटर मुळे फुगलेले. प्रशासनाने काय मदत केली आठवत नाही.शेतीचे झालेले नुकसानी बद्दल किती मदत केली हेही कळले नाही.पण या पुराच्या एकूणच नुकसानी बाबत फार कोणी चर्चा केली नाही.किंवा यावर काय उपाय योजना असू शकते याचीही प्रशासनात-लोकात कधीही चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही.
●तर हीच प्राणहीता पुढे गोदावरीला सिरोंचा जवळ नगरम गावाजवळ मिळते. तेथून काही कि.मी.अंतरावर तेलंगण सरकारने मेडीगट्टा गावाजवळ प्रचंड मोठे बॅरेज बांधले आहे.हे बॅरेज होण्यापूर्वी आम्ही काही कार्यकर्ते प्रत्यक्ष जागेवर जावून आलो होतो. सिरोंचा मधील काही कार्यकर्त्यांशी, पत्रकारांशी चर्चा केली. होणा-या नुकसानी बाबत त्यांनी तेव्हाच अंदाज बांधले होते. एका पत्रकाराला या बाबत खडा न खडा माहिती होती.पण त्याच्या माहितीचा कोणीच कसा योग्य वापर केला नाही.असे आता लक्षात येते.*आता सिरोंचा तालुक्यातील बुडीत क्षेत्रातील लोक -शेतकरी आंदोलन करीत आपली फिर्याद मांडत आहे.त्यांच्या या हालचालीला किती यश येईल माहित नाही.या बॅरेज-धरणाला महाराष्ट्र शासनाने कशी काय संमती दिली याची स्पष्टता शासनाने सिरोंचा व काठावरील गावांना दिली पाहिजे. काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी थातूरमातूर विरोध केला. त्यासाठी काठावर जावून निदर्शनही केली. पण त्यांना हा मुद्दा लावून धरण्यात खरेच रस होता का! या विषयी आता शंकाच आहे.
● १९९३-९४ ला वर्धा नदीला व इकडे वैनगंगा नदीला महापूर आला होता.वर्धा वैनगंगेला चपराळा येथे मिळते. पुढे त्या प्राणहीता म्हणून वाहते. ही प्राणहीता गोदावरीला मिळते. गोदावरी तुडूंब असली की प्राणहीतेला थोपवून धरते.मग वैनगंगा- वर्धा या ही थोपून राहतात.आजूबाजूच्या लहान नदी नाल्याचे प्रवाह त्यात सामावत असल्याने पाणी जिकडे जागा मिळेल तिकडे पुत्र सुटत. या वर्षीच्या पुरात कित्येक गावं-हजारो एकर शेती पाण्याखाली आली होती. वर्धा नदी काठावरील कित्येक मिटर उंचीवरील पाटाळा-माजरी ह्या गावासह कितीतरी गांवे पुराने वेढली होती. घरांचे, शेतीचे, जनावरांचे व *शेत जमिन खरवडून जावून प्रचंड नुकसान झाले होते.मिटींग झाल्या. मंत्री आले.सर्वे झाला पण शेती, घर ,खरवडून गेलेल्या जमीनीची दुरुस्ती-उपाययोजना किती लोकांना मिळाले हे नव्याने केले पाहिजे.या महापुरात तेव्हाचे जिल्हाधिकारी एन. आरमुगम यांनी मात्र घरे वाहून गेलेल्यांना तातडीने तात्पुरते निवारे उपलब्ध करून दिले. इकडे गडचिरोली जिल्ह्यात-चंद्रपूर -गडचिरोली राज्य महामार्ग महापुराने पुर्णपणे उखडून गेला होता. या मार्गावरील अनेक शेत जमिनी खरवडून जावून कायमच्या पडवीत झाल्या.

*पुर आला की सर्वे होतात. काही अल्पशी मदत मिळतही असेल. पण पुराबाबत कायमस्वरुपी उपायाविषयी कोणी गंभीर असल्याचे मात्र आजपर्यंत दिसून आले नाही.

● या पार्श्वभूमीवर अलिकडेच आमचे जेष्ठ स्नेही अर्थतज्ञ डाॅ. श्रीनिवास खांदेवाले यांनी “विदर्भ पूरपरिस्थिती जन -आयोग २०२२-२४” – (प्राथमिक अहवाल) वाटसएप वर पाठवला.
हा अहवाल तयार करण्यात अखिल भारतीय किसान सभा यांनी पुढाकार घेतला. या आयोगामध्ये डाॅ.खांदेवाले सह डाॅ महेश कोपुलवार, प्रदीप पुरंदरे, प्रभाकर कोंडबतुनवार,जयदीप हर्डीकर, विलास भोंगाडे यासारखे शेती-जनआंदोलनातील लोक सहभागी आहेत.
या आयोगाने गडचिरोली,नागपूर, चंद्रपूर,यवतमाळ जिल्ह्य़ातील शेतकरी -कार्यकर्ते यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन अहवाल तयार केला. अर्थातच वर म्हटल्या प्रमाणे हा ‘प्राथमिक अहवाल’ आहे.हा अवघा २४ पानाचा असला तरी त्याचे मूल्य महत्वाचे व अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल असा आहे.
जिज्ञासूंनी मुळातच हा अहवाल वाचला पाहिजे.

*मला काय वाटते *:
———————–

१.आपण गोदावरी खो-यात राहतो. जल आयोगाने गोदावरी खो-यातील विदर्भ-महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी खरेच किती वापरले.हे एकदा सांगीतले पाहिजे.
२.वैनगंगा – वर्धा या नद्यांवर मध्यप्रदेशात धरणे आहे ती तुडूंब भरल्यावर विदर्भाला आगावू सुचना देण्याची यंत्रणा आधुनिक व बळकट करणे.
३.गडचिरोली जिल्ह्यातील ब-याच नद्या ह्या छत्तीसगड मधून वाहत येतात .कठाणी, खोब्रागडी,सती नदी, गाढवी या सारख्या अनेक नद्या नाले आहेत .त्या सर्व वैनगंगेला मिळतात.
४.गेल्या दहा पंधरा वर्षातील पुराबाबतची आकडेवारी मिळवून -त्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी मिळवून प्रत्यक्ष मिळालेले नुकसान व मिळणे आवश्यक असलेले नुकसान याचा ताळेबंद मांडता येईल.
५.पुरामुळे खरवडून गेलेल्या जमिनीवर उपाय योजना. हा मुद्दा आजपर्यंत दुर्लक्षित राहीलेला आहे.त्यावर शेती-माती वैज्ञानिकांनी ठोस उपाय सुचवावे.
६.गडचिरोली,चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव आहे.१००हेक्टर पर्यंतच्या तलावाची देखभाल जिल्हा परिषदे कडे आहे.त्यावरील तलाव राज्य जलसंपदा विभागाकडे. हे सर्व तलाव मुळ साठवण क्षमता येईल येथ पर्यंत खोलीकरण करणे. तसेच ह्या तलावावर अतिक्रमण सुध्दा झालेले आहे.त्यामुळेच यांची पुन्हा मोजणी होणे आवश्यक आहे.त्याकरिता शासनाने एक मास्टर प्लॅन करणे आवश्यक.
● १९९४ च्या अतिवृष्टीत ह्या माजी मालगुजारी तलावापैकी बरेच तलाव फुटून वाहून लागले होते.यांचे मजबूती बाबतही एकदा सर्वे होणे
आवश्यक.कारण त्यांचे वय.
● वर्धा नदीच्या दोन्ही बाजूला चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्यात ओपन कोल माईन्स आहे.त्या माईन्स ची सर्व माती वर्धा नदी काठावर डम्प केल्या जाते.त्यामुळेही पुराचे भयावह रूप दिवसेंदिवस उग्र होत आहे.या बाबतही धोरण निश्चितीची गरज आहे.

या अहवालात एक निष्कर्ष आहे तो फारच गंभीर आहे.-
” ही समस्या वारंवार निर्माण झाल्याने या समस्या असलेल्या भागातील लोकांमध्ये एक प्रकारची सामुहिक निराशा दिसून येते. ती निराशा फक्त शेती करण्याबाबत नसून एकंदरीतच त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये सुध्दा दिसून आलेली आहे.”
अहवालात असेही नमूद आहे की,”दुर्दैवाने या प्रश्नाच्या समस्याग्रस्त लोकांनी जेव्हा आपला प्रश्न स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्यक्ष पुरा दरम्यान लोकांना आलेले अनुभव हे फारसे मानवीय व संवेदनशील दिसून आलेले नाहीत ” हे तर अतीशय गंभीर आहे.

हा “विदर्भ पूर परिस्थिती जन- आयोग २०२२•२३”
प्राथमिक का असेना पण आपल्या डोळ्यात अंजन अन डोक्यात लख्ख विज चमकवणारा नक्कीच आहे. आयोगाचे अध्यक्ष डाॅ. खांदेवाले सर व त्यांचे सहकारी यापुढे यात आकड्यांची, विश्लेषणाचीभर घालून शासनाचे डोळे उघडतील ..

प्रभू राजगडकर
नागपूर
दि.९ जाने २०२३