‘दिशा’प्रश्नांच्या गोंधळात विदर्भातील मानव—वन्यजीव प्रश्न ‘दिशाहीन’

 

आपल्याला आठवंत? खुशी बंडू ठाकरे आवळगांव (वय ८ वर्ष), बाल्या देवराव ढोरे,चिचगांव (वय ८ वर्ष), बाल्या बगमारे, वांद्रा (वय ८ वर्ष), बाल्या सालोरकर, मुरपार (वय १० वर्ष), खुशी जितेंद्र हजारे सिर्सी (वय 4 वर्ष),, संस्कार सतीश बुरले कापसी (वय 9 वर्ष)……. आणखी कितीतरी…. नेमका आकडा कुणालाही सांगता येत नाही.. ही सारी नांवे आहेत, खेळकरी—शाळकरी मुलांची.. हसण्या—बाळगण्याच्या वयात, आपल्या असण्यांने आई—वडिलांच्या चेहर्यावर हास्य फुलविण्यांच्या वयात वाघांची शिकार झालेत, अगदी या दोन वर्षाच्या कालावधीत.. या लेकरांसोबत अनेक शेतकरी, महिला, गुराखी, शेतमजूर वाघांचे खाद्य झालेत.. पण यावर सुतक कुणाला आहे? रोज मरे त्याला कोण रडे? विदर्भातील जंगलाजवळ राहणार्यांचे दु:ख समजून कोण घेणार? राज्यकर्ते? छे!!!! त्यांना या लहानग्याचे दु:खाशी काय सोयर—सुतक? त्याना तर, त्यांचे राजकीय सोयीसाठी ‘दिशा’ हवी आहे, होय दिशाच…!

विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यांसाठी दरवर्षी विधीमंडळांच अधिवेशन नागपूरात भरते. राज्याची सरकार नागपूरात येते. अडिच वर्ष या अधिवेशनाने विदर्भाला बगल दिली, त्यामुळे मानव—वन्यजीव संघर्षाची तीव्रता विधीमंडळात चर्चेला येवू शकली नाही. मुंबईत भरलेल्या सिमेंटच्या जंगलातील अधिवेशनात पूर्व विदर्भातील अत्यंत जिव्हाळ्याचा झालेला वाघाच्या हल्यातील माणसाचे मृत्यू, बालक—महिलांचे मृत्यू, रानडुक्कराच्या आणि वन्यजीवांमुळे नासाडी झालेल्या शेतीचा प्रश्न चर्चेला येईल याची कोणतीही खात्री नव्हती, आणि झालेली तसेच.. यावर्षी मात्र विदर्भातील अधिवेशनात चंद्रपूर—गडचिरोली जिल्हयातील वन्यजीवांचा प्रश्नाला नेमकी ​दिशा मिळेल असे वाटत होते, मात्र झाले उलटेच… हा प्रश्न साधा चर्चेलाही आला नाही, कुणी चर्चाही उपस्थित केली नाही मात्र विदर्भातील प्रश्नाकरीता घेतलेल्या या अधिवेशनात आपले राजकीय हेतू साध्य करण्याकरीता, कुणीतरी आमदारांनी दिशा सालीयान या अभिनेत्रीच्या मृत्यूची चर्चा सभागृहात घडवून आणली आणि जाणीवपुर्वक दिवसभर यावर गोंधळ करून, सभागृहाचे कामकाज बंद पाडले, सरकारने एसआयटी नेमली, वर्तमानपत्र आणि टिव्हीच्या ठळक बातम्यात विदर्भातील मुख्य प्रश्न दिशाहीन करून टाकले.

एका अभिनेत्रीचा मृत्यूसाठी विदर्भातील प्रश्नासाठी असलेले संपूर्ण अधिवेशनात गोंधळ केल्या जात असतांना, विदर्भातील कोवळ्या मुलांच्या सरकारी दिरंगाईमुळे होणार्या मृत्यूसाठी एक क्षणही कुणी भाष्य करू नये, हे क्लेशदायक आहे. कोण दिशा सालीयान? विदर्भाशी तिचा संबध काय? जर सरकारला तीचा मृत्यू अपघाती किंवा अनैसर्गीक वाटत असेल, तर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करायला पाहीजे… कुणाचा विरोध आहे? यासाठी अधिवेशनात ऐवढे आरडा—ओरड करण्याची गरज काय? मात्र ‘हवा’ करण्यासाठी जाणीवपूर्वक गरज नसतांना प्रकरणाच्या चिंद्या फाडल्या जात आहे आणि ज्यासाठी हे अधिवेशन घेतल्या जात आहे, ते मुळ प्रश्न मात्र बाजूला पडत आहे.
दर आठवड्यात वाघाच्या हल्यात चार—पाच निष्पाप जीव मरत आहे, शेतकर्यांना शेतात शेतीसाठी जाता येत नाही, खेडी गावात कापूस वेचत असतांना वाघांनी महीलेला ठार केले, रूद्रापुरात शेतकरी चुरणे करीत असतांना वाघाचे भक्ष्य ठरले, गुराखी गुरे चरायला गेले तर परत येईल याची शाश्वती नसते. शेतात गेलेला माणूस परत आला नाही तर, वाघाचे भक्ष्य झालेच असावे असाच कयास लावल्या जात आहे. जनावरांवर झालेले वन्यप्राण्यांचे हल्ले ऐवढे वाढले आहे की, आता कुणाला ती बातमीही वाटत नाही.

वन्यप्राण्यांच्या भितीने हजारो एकर शेती पडीत ठेवल्या जात आहे. ज्या शेतात पीक लावल्या गेले, त्या शेतातील पीक घरापर्यंत पूर्ण येईल याची कोणतीही खात्री नाही, रान—डुक्कराचे कळपे वाढत आहे, त्यांचे हल्ले आणि शेतीची नुकसानही वाढत आहे. गडचिरोली जिल्हयात रानटी हत्तीने नुकसान करणे सुरू केले आहे. पुर्वी आम्ही जंगलाजवळ राहत आहोत अशी भावना होती, आता जंगलातच वास्तव आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुणाच्या राईस मिलमध्ये वाघ शिरल्यांच्या बातम्या आहेत, तर कुणाच्या घरात बिबट्यांनी ठाण मांडल्यांच्या चर्चा आहेत.. एकूणच जगण्यांचा प्रश्न गंभीर होत असतांना, विधी मंडळात यावर मात्र सत्ताधिकारी काही करीत नाही किंवा या भागातील विरोधी आमदारही काही बोलत नाही. माणसांच्या जीवांपेक्षा वन्यप्राण्यांचे जीव जसे महत्वाचे झाले आहे, तसेच सरकारला गरीबांच्या जीवांपेक्षाही सेलिब्रीटीच्या आडून आपले राजकीय हिशेब चुकते करण्यांतच रस आहे, असे समजायचे काय?

विजय सिध्दावार
9422910167